रांची : जयपूरच्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात दीमाखदार विजयासह मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्या पर्वाला झोकात प्रारंभ झाला. शुक्रवारी रांचीतील दुसऱ्या सामन्यात विजयासह न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत विजयी आघाडीचे लक्ष्य भारतापुढे आहे. यावेळी मधल्या फळीकडून परिणामकारक फलंदाजीची अपेक्षा बाळगण्यात येत आहे.

पहिल्या सामन्यातील भारताच्या विजयात आघाडीच्या फळीच्या फलंदाजीचे आणि नियंत्रित गोलंदाजीचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळेच न्यूझीलंडविरुद्धची तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील पराभवाची मालिका सात सामन्यांनंतर खंडित करण्यात यश आले. सायंकाळी दवाचा घटक प्रभावी होत असल्याने नाणेफेकीचा कौल हा निर्णायक ठरत आहे.

सूर्यकुमारवर भिस्त

सध्या विश्रांतीवर असलेल्या विराट कोहलीच्या अनपुस्थितीत सूर्यकुमार यादवने संधीचे सोने करताना सामना जिंकून देणारी ४२ चेंडूंत ६२ धावांची खेळी साकारली. रोहितने ४८ धावांची खेळी साकारतानाच उपकर्णधार केएल राहुलच्या साथीने अर्धशतकी सलामीसुद्धा दिली. मात्र उत्तरार्धात लक्ष्य आवाक्यात असताना श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांचे अनाठायी बळी गमावले. प्रदीर्घ काळाने भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रेयसला ८ चेंडूंत ५ धावाच करता आल्या, तर वेंकटेशचे पदार्पण ४ धावांपुरते मर्यादित राहिले.

भुवनेश्वर लयीत

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी अनुभवाच्या बळावर अप्रतिम गोलंदाजी करताना प्रत्येकी दोन बळी मिळवले. हे या सामन्यातील सकारात्मक फलित म्हणता येईल. अन्य अननुभवी गोलंदाज महागडे ठरत असताना या दोघांनी किवी फलंदाजांना जखडून ठेवले. ट्वेन्टी-२० विश्वचषकामध्ये पाकिस्तानविरुद्ध पराभवानंतर वगळण्यात आलेल्या भुवनेश्वरला राहुल-रोहित नेतृत्वाने दिलेल्या संधीचे त्याने सोने केले. ‘आयपीएल’ दुसऱ्या टप्प्यात सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना भुवनेश्वर अपयशी ठरला होता. सहा सामन्यांत त्याला फक्त तीन बळी मिळवता आले होते. अखेरच्या पाच षटकांत भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना फक्त ४१ धावा देत तीन बळी मिळवले.

गप्टिल-चॅपमनवर मदार

कर्णधार केन विल्यम्सनच्या अनुपस्थितीत मार्क चॅपमनने सात महिन्यांनंतर मिळालेल्या संधीचा फायदा उचलत ५० चेंडूंत ६३ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. मार्टिन गप्टिलने ७० धावा करीत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला, परंतु डॅरेल मिचेल, ग्लेन फिलिप्स, टिम सेईफर्ट, रचिन रवींद्र यांना धावांचा वेग टिकवणारी फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे न्यूझीलंडला १८० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही.

१०० टक्के प्रेक्षकक्षमता

राज्य शासनाने हिरवा कंदील दिल्यामुळे दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्याला स्टेडियममध्ये १०० टक्के प्रेक्षकक्षमता दिसून येईल, असे मत झारखंड राज्य क्रिकेट संघटनेचे सचिव संजय सहाय यांनी सांगितले. ‘‘प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेशासाठी दुहेरी लसीकरण प्रमाणपत्र किंवा ४८ तासांमधील करोना चाचणी अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. ३९ हजार प्रेक्षकक्षमतेच्या या स्टेडियममधील ९०० रुपये ते ९ हजार रुपयांपर्यंतच्या सर्व तिकीट विकल्या गेल्या आहेत,’’ अशी माहिती सहाय यांनी दिली.

सोधी परतणार?

पहिल्या सामन्यात कर्णधार टिम साऊदी आणि ट्रेंट बोल्टच्या साथीने लॉकी फग्र्युसनने वेगवान माऱ्याची धुरा वाहिली. मिचेल सँटनरने चार षटकांत फक्त १९ धावा देत भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवला. इश सोधीच्या अनुपस्थितीत फिरकी गोलंदाज म्हणून सँटनरला साथ देणाऱ्या टॉड अ‍ॅस्टलने तीन षटकांत ३४ धावा दिल्या. त्यामुळे अनुभवी सोधी दुसऱ्या सामन्यात खेळण्याची शक्यता बळावली आहे.

’ वेळ : सायंकाळी ७ वा. ’ थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी