आशियाई स्तरावर पदकांची लयलूट केल्यानंतर स्वर्ग चार बोटे अंतरावर उरल्याचे भारतीय धावपटूंना वाटले होते. मात्र आशियाई आणि जागतिक या दोन स्पर्धाच्या दर्जात खूप मोठा फरक आहे, हे मॉस्कोला गेल्यानंतरच भारतीय धावपटूंना कळून चुकले असेल. जागतिक स्पर्धेत विकास गौडा याने मिळविलेल्या सातव्या क्रमांकाचा अपवाद वगळता भारतीय खेळाडूंनी सपशेल निराशा केली.
घोडय़ाला तुम्ही भलेही पाण्याजवळ नेले तरी ते पाणी प्यायचे की नाही हे घोडाच ठरवत असतो. तद्वत भारतीय धावपटूंची स्थिती आहे. आता सर्व सुविधा खेळाडूंच्या पायाशी लोळण घेत असल्या तरी अव्वल कामगिरी करण्याची इच्छाशक्ती त्यांच्याकडे नसेल तर भारतीय खेळाडूंची पाटी कोरीच राहणार. यंदाही हाच अनुभव पाहायला मिळाला. १५ खेळाडूंच्या पथकापैकी केवळ एकच खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. अन्य खेळाडूंना प्राथमिक फेरीतच अपयश आले. अमेरिकेत गेली काही वर्षे प्रशिक्षण घेणाऱ्या विकास गौडाने थाळीफेकमध्ये आठ खेळाडूंमध्ये सातवे स्थान घेतले. भारतासाठी हीच एकमेव जमेची बाजू ठरली.
पूर्वी भारतीय अ‍ॅथलिट्सना फारशा सुविधा आणि सवलती मिळत नव्हत्या. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पूर्वीच्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी कारकीर्द घडवली. आता प्रत्येक खेळाडूला भरघोस सवलती व सुविधा मिळत आहेत. प्रत्येक क्रीडा प्रकारासाठी स्वतंत्र प्रशिक्षक आहेत. गेली अनेक वर्षे भारतीय धावपटूंकरिता परदेशी प्रशिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र असे असूनही भारतीय खेळाडूंची कामगिरी मर्यादितच पाहायला मिळत आहे.
तिहेरी उडीत राष्ट्रीय विक्रमवीर रंजित महेश्वरी हा अंतिम फेरीसाठी असलेली पात्रता पूर्ण करू शकला नाही. यावरूनच आपल्या राष्ट्रीय विक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर काय स्थान आहे, हे सहजपणे लक्षात येऊ शकेल. महेश्वरीने २०११मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतही निराशा केली होती. तसेच लंडन ऑलिम्पिकमध्येही तो सपशेल अपयशी ठरला होता. अनेक वेळा आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी ठरूनही अजून भारत त्याच्यावरच अवलंबून राहतो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत गेली अनेक वर्षे आशियाई स्तरावर भारतीय खेळाडूंनी वर्चस्व राखले आहे. भारतीय खेळाडूंनी पुण्यात झालेल्या आशियाई मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना ३ मिनिटे ३२.२६ सेकंद अशी वेळ नोंदविली होती. मॉस्कोत मात्र त्यांनी ही शर्यत ३ मिनिटे ३८.८१ सेकंदांत पूर्ण केली. उत्तेजक औषध सेवनाबद्दल दोन वर्षे बंदीचा कालावधी संपल्यामुळे अश्विनी आकुनजी हिला या संघाबरोबर नेण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात तिला संधी द्यायची नव्हती तर तिला तेथे पाठवून भारतीय संघटकांनी नेमके काय साधले. तिच्याऐवजी एखाद्या युवा खेळाडूला संधी दिली असती तर भावी कारकिर्दीसाठी या खेळाडूला अनुभवाची शिदोरी मिळाली असती. महिलांच्या २० किलोमीटर चालण्याच्या शर्यतीत खुशबीर कौर या भारतीय खेळाडूने राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, मात्र या शर्यतीत तिला ३९वे स्थान मिळाले. यावरून आपल्या देशातील खेळाडूंचा सुमार दर्जा सहज स्पष्ट होतो. स्टीपलचेसमध्ये सुधा सिंगला पहिल्या २० खेळाडूंमध्ये स्थान मिळविता आले नाही. आशियाई व राष्ट्रकुल पदक विजेत्या सुधा सिंगकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र जागतिक स्पर्धेत तिने आत्मविश्वासाचा अभाव दाखविला.
आजपर्यंत भारतीय अ‍ॅथलिट्सच्या कामगिरीचा विचार केल्यास ऑलिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक झाली आहे. अगदी मोजकेच खेळाडू ऑलिम्पिकमधील मुख्य फेरीत पोहोचले आहेत. मिल्खा सिंग यांनी रोम येथे १९६०मध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटर शर्यतीत अंतिम फेरीत स्थान मिळविले होते. त्यांचे कांस्यपदक एक दशांश सेकंदांनी हुकले होते. या शर्यतीत ३०० मीटर अंतरापर्यंत त्यांच्याकडे आघाडी होती, मात्र शेवटच्या १०० मीटरमध्ये ते मागे पडले व चौथ्या क्रमांकाने त्यांनी शर्यत पूर्ण केली. भारताची सुवर्णकन्या म्हणून नावलौकिक मिळविलेल्या पी. टी. उषा हिलादेखील १९८४च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाने हुलकावणी दिली. ४०० मीटर अडथळा शर्यतीत तिचे कांस्यपदक एक शतांश सेकंदांनी हुकले.
अगदी अलीकडच्या काळात अंजू बॉबी जॉर्ज हिने जागतिक स्पर्धेत लांब उडीत ऐतिहासिक कांस्यपदक मिळविले. मात्र नंतरच्या ऑलिम्पिकमध्ये अंजूने तीन वेळा चुका केल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद व्हावे लागले. ऑलिम्पिक पात्रता निकष पार केला म्हणजे पदकच मिळविणार अशी भ्रामक कल्पना आपल्या खेळाडूंची असते आणि प्रत्यक्ष ऑलिम्पिकमध्ये ‘अति झाले व हसू आले’ अशीच त्यांची स्थिती होते.
ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धासाठी भारतीय खेळाडूंची निवड करताना पात्रता ‘ब’ निकषाचा आधार घेतला जातो. तसेच स्पर्धेपूर्वी जेमतेम काही दिवस राहिले असताना ही निवड केली जाते. पुण्यात झालेल्या आशियाई स्पर्धेकडे चीनच्या अनेक मुख्य खेळाडूंनी पाठ फिरविली होती. त्याऐवजी त्यांनी त्यांच्या देशातील राष्ट्रीय स्पर्धेला प्राधान्य दिले होते, कारण या स्पर्धेतून २०१६च्या ऑलिम्पिकसाठी चीनच्या संभाव्य खेळाडूंची निवड केली जाणार होती. यावरून आशियाई स्पर्धेकडे ते फारसे गांभीर्याने पाहत नाहीत हे लक्षात येते. आपले संघटक मात्र आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट केल्यानंतर सारा देश डोक्यावर घेतात. तथापि, आशियाई स्पर्धेतील यश म्हणजे फुसका बार होता हे आता स्पष्ट झाले आहे. जागतिक स्पर्धेच्या तुलनेत आपले खेळाडू किती दुय्यम दर्जाचे आहेत हे नाईलाजास्तव सांगावे लागते. या कामगिरीवरून बोध घेत पुढच्या जागतिक स्पर्धेसाठी आतापासूनच भारतीय संघटकांनी तयारी सुरू करण्याची आवश्यकता आहे.