Pakistan Cricket Team Imam-ul-Haq Fake Injury Controversy: पाकिस्तान क्रिकेट संघ आणि खेळाडू सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान पाकिस्तान संघाने अचानक ७ खेळाडूंना संघाबाहेर केलं आहे. तर दुसऱ्या कसोटीदरम्यान पाकिस्तानचा खेळाडू इमाम उल हक याने दुखापत झाल्याचं नाटक केलं होतं, अशी चर्चा रंगली आहे. यावर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चौकशी सुरू केली. चौकशी सुरू केल्यानंतर या फलंदाजाने मोठं पाऊल उचललं आहे.

पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक PCBच्या तातडीच्या चौकशीविरोधात कायदेशीर आव्हान देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याला झालेल्या कथित पोटरीच्या दुखापतीप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीला आव्हान देण्यासाठी इमाम वकिलाचा सल्ला घेण्याची शक्यता आहे.

इंग्लंडच्या पहिल्या डावात क्षेत्ररक्षण करताना इमामच्या पोटरीला दुखापत झाली होती आणि ‘मसल टिअर’ झाल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने पाकिस्तानच्या दोन्ही डावांत फलंदाजी केली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याला १० दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, कसोटीच्या चौथ्या दिवशी पोटरीवर पट्टी बांधलेल्या अवस्थेत इमाम थ्रोडाऊन्स करताना दिसला. त्यानंतर त्याला ड्रेसिंग रूममध्ये परत जाण्यास सांगण्यात आलं. इमामने दुखापतीचं नाटक केल्याचा आणि त्याला झालेली दुखापत खरी नसल्याचा संशय काही माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केला. यानंतर इमामसह इतर सहा खेळाडूंनाही पाकिस्तानला परत बोलावण्यात आलं आणि ते मंगळवारी सकाळी मायदेशी पोहोचले.

इमाम-उल-हक वकिलाची मदत घेणार?

इमाम-उल-हक अडचणीत सापडला असून, त्याला PCBच्या चौकशी समितीसमोर हजर राहावं लागणार आहे. या चौकशीत इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत त्याच्या पोटरीच्या दुखापतीमुळे दोन्ही डावांत फलंदाजी का केली नाही, याचा तपास केला जाणार आहे. या प्रकरणासाठी इमाम कायदेशीर सल्ला घेण्याची शक्यता असल्याचं एका सूत्राने सांगितलं.

PTIने दिलेल्या माहितीनुसार, एका सूत्राने म्हटलं, “इमाम मोठ्या अडचणीत आहे. बोर्डाच्या चौकशी समितीसमोर त्याला हजर राहावं लागणार असून, या प्रकरणात तो कायदेशीर सल्लाही घेण्याची शक्यता आहे. दुसऱ्या कसोटीत पोटरीच्या दुखापतीमुळे तो दोन्ही डावांत फलंदाजी करू शकला नव्हता.”

याशिवाय, पाकिस्तानचे माजी मुख्य निवडकर्ता मोहम्मद वसीम यांनी २०२२ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान संघाचे फिजिओ क्लिफ डीकिन यांनी इमामच्या वारंवार होणाऱ्या दुखापतींच्या पॅटर्नबाबत चिंता व्यक्त केल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे आता इमामच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, २०२५ मध्ये PCBच्या एका समितीने न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान इमामने पायाच्या अंगठ्याला झालेली दुखापत बनावट असल्याचं ठरवलं होतं आणि त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून बंदी घालण्याची शिफारस केली होती, असा दावा करणारा मीडिया रिपोर्टही समोर आला आहे. या रिपोर्टमुळे इमामच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.