Imane Khalif vs Angela Carini: मनु भाकेर, स्वप्नील कुसाळे या खेळाडूंनी भारताला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून दिलं आहे. पथकातल्या इतर खेळाडूंकडूनही भारताला पदकांच्या आशा आहेत. एकीकडे भारतीय खेळाडूंच्या कामगिरीची चर्चा होत असतानाच दुसरीकडे अल्जेरियाच्या एका बॉक्सरचं नाव वादात सापडलं आहे. सामना सुरू होण्याच्या ४६ सेकंदांमध्ये विरोधात खेळणाऱ्या महिला खेळाडूनं सामनाच सोडत असल्याचं जाहीर केलं आणि अल्जेरियाच्या इमेन खलिफचं नाव चर्चेत आलं. कारण पुरुषी गुणधर्म असूनही इमेनला महिला म्हणून महिलांच्या श्रेणीत का खेळवलं गेलं? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. नेमकं काय घडलं? गुरुवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अल्जेरियाच्या इमेन खलिफचा सामना इटलीच्या अँजेला कॅरिनीसोबत होता. २५ वर्षीय अँजेला कॅरिनीला समर्थन देण्यासाठी इटलीचे क्रीडाप्रेमी मोठ्या प्रमाणावर पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजमधील स्टेडियमवर उपस्थित होते. पण सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या ४६ सेकंदांत संपला. कारण अँजेल कॅरिनीनं सामना सोडत असल्याचं जाहीर केलं. उपस्थित प्रेक्षकांना याचं नेमकं कारण तेव्हा कळलं नाही. पण नंतर मात्र या सगळ्या प्रकाराचं कारण समोर आलं. बॉक्सिंग रिंगमध्ये गेल्यानंतर पुढच्या ४६ सेकंदांत कॅरिनीला इमेन खलिफकडून दोन ते तीन वेळा थेट चेहऱ्यावर प्रहार सहन करावे लागले. यात तिचं हेडगिअरही सैल झालं. कॅरिनी लगेच रिंगच्या कोपऱ्यात उभ्या प्रशिक्षकाकडे गेली आणि त्यांनी सामना सोडत असल्याचं जाहीर केलं. यानंतर कॅरिनी रिंगमध्ये गुडघ्यावर बसून ओक्साबोक्शी रडू लागली. सामन्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना कॅरिनीनं असं करण्यामागचं कारण सांगितलं. काय म्हणाली अँजेल कॅरिनी? अँजेलनं त्या ४६ सेकंदांत इमेन खलिफनं लगावलेल्या पंचच्या वेदना खूप जास्त होत्या असं असल्याचं सांगितलं. "मला तेव्हा माझ्या नाकावर खूप जास्त वेदना होऊ लागल्या होत्या. मी एक अनुभवी आणि प्रगल्भ बॉक्सर आहे. त्यामुळे सगळ्याचा सारासार विचार करून मी थांबणंच योग्य असल्याचं सांगितलं. कारण मला आणखी गंभीर परिणाम नको होते. त्यामुळे मी सामना संपवू शकले नाही", असं अँजेल म्हणाली. महाराष्ट्राचा खेळाडू ऑलिम्पिक पदकवीर "माझ्या प्रकृतीसाठी मी थांबण्याचा निर्णय घेतला. मी असा पंच याआधी कधीच झेलला नव्हता. मी लढण्यासाठीच रिंगमध्ये उतरले होते. समोर कोण आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. जे घडलं ते योग्य होतं की नाही हे ठरवण्याचा मला अधिकार नाही. मी फक्त माझं काम केलं. जेव्हा मला जाणीव झाली की आता मी पुढे लढू शकत नाही, तेव्हा एका प्रगल्भ खेळाडूप्रमाणे मी थांबण्याचा निर्णय घेतला. माझी ही कृती म्हणजे शरण जाणं नसून 'आता बस्स' म्हणण्याची प्रगल्भा असणं आहे", असं कॅरिनी म्हणाली. Imane Khalif in Paris Olympic: XY क्रोमोझोन्समुळे गच्छंती ते पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष असल्याच्या वादानं सुरुवात; कोण आहे इमेन खलिफ! इमेन खलिफवरून वाद का? इमेन खलिफ खरंच महिला खेळाडू आहे की पुरुष? यावर मोठा वाद निर्माण झाला आहे. खलिफला ऑलिम्पिकमध्ये खेळू देण्याच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेच्या निर्णयावरही आता टीका होऊ लागली आहे. गेल्या वर्षी नवी दिल्लीमध्ये वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या अवघ्या काही तास आधी इमेन खलिफ लिंगचाचणीमध्ये अपात्र ठरली होती. याच कारणामुळे तैवानच्या दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या लिन यु-तिंगचं ब्रॉन्झ मेडलही काढून घेण्यात आलं होतं. या दोन्ही खेळाडूंच्या डीएनए टेस्टमध्ये त्यांच्याक XY क्रोमोझोम असल्याचं आढळून आल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आल्याचं तत्कालीन आयबीए अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी सांगितलं होतं. XY क्रोमोझोम हे पुरुषांच्या डीएनएचे घटक असतात तर XX क्रोमोझोम हे महिलांच्या डीएनएचे घटक असतात. दरम्यान, या दोन्ही बॉक्सर्सला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मात्र सहभाग घेण्याची परवानगी देण्यात आली. आयबीएला चाचण्या करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेनं मान्यता दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या चाचण्या व त्यांचे निकाल हे पॅरिस ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठीचे निकष म्हणून ग्राह्य धरले गेले नाहीत. या पार्श्वभूमीवर इमेन खलिफ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली आणि आता पहिल्याच सामन्यात तिच्या सहभागावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. जगभरातून असंख्य क्रीडाप्रेमींनी अँजेला कॅरिनीला समर्थन दिलं असून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषदेवर टीका केली आहे.