Who is Imane Khalif: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दररोज विभिन्न क्रीडाप्रकारांचे सामने होत आहेत. या सामन्यांसाठी मोठ्या संख्येनं क्रीडाप्रेमी स्टेडियममध्ये हजेरीही लावत आहेत. एकीकडे जगभरातले क्रीडापटू मोठ्या उत्साहात त्यांचे विजय साजरे करत असताना दुसरीकडे अल्जेरियाची बॉक्सर इमेन खलिफसाठी मात्र तिचा पहिलावहिला विजयही वादग्रस्त ठरला आहे. तिच्या पहिल्याच सामन्या इटलीची प्रतिस्पर्धी बॉक्सर अँजेला कॅरिनीनं अवघ्या ४६ सेकंदांत सामना सोडण्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली. इमेन खलिफ स्त्री आहे की पुरूष? यावरून सध्या पॅरिस ऑलिम्पिक व्हिलेजसह जगभरातल्या क्रीडाप्रेमींमध्ये मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. पण इमेन खलिफ नक्की आहे तरी कोण? काय आहे तिची पार्श्वभूमी?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वादाला कुठे तोंड फुटलं?

अल्जेरियाच्या इमेन खलिफचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इटलीच्या अँजेला कॅरिनीशी पहिलाच बॉक्सिंगचा सामना होता. दोन्ही बाजूच्या क्रीडाप्रेमींनी आपापल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. पण सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या ४६ सेकंदांत संपला. कारण अँजेला कॅरिनीनं सामन्यातून माघार घेतली होती. यामुळे मोठ्या चर्चेला तोंड फुटलं. खुद्द अँजेलानं सामन्यानंतर माध्यमांशी बोलताना “इतका वेदनादायी पंच मी आजतागायत कधीच झेलला नव्हता, मला वेदना असह्य झाल्या म्हणून सामना थांबवण्याचा निर्णय मी घेतला”, अशी प्रतिक्रिया दिली.

अशा प्रकारे सामना संपल्यामुळे इमेन खलिफ विजयी जरी झाली असली, तरी तिच्या विजयावर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली. हॅरी पॉटर पुस्तक मालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी तर या सामन्याचं वर्णन ‘एक पुरुष एका महिलेला दिवसाढवळ्या मारहाण करत आहे’, असं केलं. एलॉन मस्कपासून जे. के. रोलिंगपर्यंत अनेक दिग्गजांनी अँजेला कॅरिनीला पाठिंबा दिला आणि इमेन खलिफ वादाच्या भोवऱ्यात अडकली.

कोण आहे Imane Khalif?

२५ वर्षीय इमेन मूळची अल्जेरियातल्या तिएरेट भागातली आहे. ती सध्या UNICEF ची ब्रँड अॅम्बेसिडरदेखील आहे. खलिफच्या वडिलांना मुलींनी बॉक्सिंग खेळणं मान्य नव्हतं. पण खलिफ तिच्या भूमिकेवर ठाम होती. तिला नव्या पिढीच्या मुलींसमोर वेगळा आदर्श ठेवायचा होता.

खलिफनं २०१८ च्या बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पदार्पणाच्या स्पर्धेत तिला फारशी चमक दाखवता आली नाही. ती १७व्या स्थानी राहिली. २०१९ सालच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिची आणखी घसरण झाली. ती १९व्या स्थानावर गेली. यानंतर इमेन खलिफ क्रीडाप्रेमींना थेट २०२१ च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिसली. तिथे आयर्लंडच्या केली हॅरिंग्टननं उपांत्यपूर्व फेरीत इमेनचा पराभव केला. त्यानंतर झालेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मात्र इमेन खलिफनं जोरदार मुसंडी मारली. या स्पर्धेत इमेनला अॅमी ब्रॉडहर्स्टकडून पराभव जरी पत्करावा लागला असला, तरी तिनं थेट दुसऱ्या स्थानी झेप घेतली होती.

Imane Khalif Controversy: पुरुष की स्त्री? पॅरिस ऑलिम्पिकमध्ये इमेन खलिफवरून मोठा वाद; प्रतिस्पर्धी महिला खेळाडूनं सामनाच सोडला!

२०२२ साली झालेल्या आफ्रिकन चॅम्पियनशिपमध्ये इमेन खलिफनं सुवर्णपदकाची कमाई केली आणि बॉक्सिंग विश्वात तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. त्यापाठोपाठ २०२३ साली झालेल्या मेडिटेरेनियन गेम्स आणि अरब गेम्समध्येही इमेन खलिफनं सुवर्णपदक जिंकून आपलं कौशल्य सिद्ध केलं.

२०२३ साली झालेला वाद आणि इमेनचा बचाव!

इमेनला पहिला झटका २०२३ सालच्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये बसला. पण हा झटका तिला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून नव्हे, तर स्पर्धा व्यवस्थापनाकडून बसला. नवी दिल्लीत भरवलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्याच्या काही तास आधी इमेनला आयोजकांनी अपात्र ठरवलं. IBA अर्थात इंटरनॅशनल बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमर क्रेमलेव यांनी यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली होती.

“इमेन खलिफच्या डीएनए टेस्टच्या आधारे आम्ही हा निर्णय घेतला आहे. या चाचणीच्या निष्कर्षांनुसार खलिफच्या डीएनमध्ये XY क्रोमोझोम आढळले. ज्या खेळाडूंच्या डीएनएमझ्ये हे क्रोमोझोम सापडले, त्यांना स्पर्धेतून बाहेर काढण्यात आलं आहे”, अशी माहिती क्रेमलेव यांनी दिली. त्यावेळी इमेन खलिफसोबतच तैवानच्या लिन यू-तिंगलाही याच कारणामुळे स्पर्धेबाहेर करण्यात आलं होतं. पुरुषांच्या डीएनएमध्ये XY क्रोमोझोन आढळतात तर महिलांच्या डीएनएमध्ये XX क्रोमोझोन आढळतात.

इमेन खलिफनं केला निषेध

दरम्यान, खलिफला स्पर्धेबाहेर केल्यानंतर तिनं यामागे कारस्थान असल्याचा आरोप २०२३ साली केला होता. “काही देश असे आहेत, की ज्यांची अल्जेरियानं सुवर्ण पदक जिंकूच नये अशी इच्छा आहे. हे एक मोठं कारस्थान असून आम्ही यावर गप्प बसणार नाही”, असं इमेन म्हणाली होती. अल्जेरियन ऑलिम्पिक समितीनं तेव्हा इमेनला ‘वैद्यकीय’ कारणांमुळे स्पर्धेबाहेर व्हावं लागल्याची सावध प्रतिक्रिया दिली होती.

अल्जेरियाच्या महिला खेळाडूवरून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाद (फोटो – रॉयटर्स)

IOC नं केलं इमेन खलिफचं समर्थन!

दरम्यान, इमेन खलिफच्या पात्रतेवरून वाद निर्माण झाल्यानंतर आता IOC अर्थात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं इमेनच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. “खलिफच्या पासपोर्टवर तिचा उल्लेख ‘महिला’ असा आहे. जेव्हापासून तो उल्लेख तिच्या पासपोर्टवर आला आहे, तेव्हापासून ती महिलांच्या ६६ किलो वजनी गटात खेळत आहे”, अशी भूमिका आयओसीचे प्रवक्ते मार्क अॅडम यांनी मांडली आहे. “महिला गटात खेळणारे सर्व खेळाडू स्पर्धेच्या पात्रता निकषांची पूर्तता करतात. या खेळाडूंच्या पासपोर्टवर महिला असा उल्लेख आहे. याचाच अर्थ त्या सर्व महिला आहेत”, असं मार्क अॅडम म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imane khalif male or female got in controversy wins against angela carini paris olympic main dc pmw
Show comments