संघांना अतिरिक्त गोलंदाज किंवा अतिरिक्त फलंदाज खेळवता यावा या विचारातून आयपीएल प्रशासनाने २०२३ हंगामापासून इम्पॅक्ट प्लेयर हा नियम लागू केला. प्रत्येक संघातर्फे अंतिम अकराच्या बरोबरीने ५ अतिरिक्त खेळाडूंची यादी सादर केली जाते. यामध्ये फलंदाज, अष्टपैलू, फिरकीपटू, वेगवान गोलंदाज अशा प्रत्येक प्रकारातील खेळाडूचा समावेश असतो. सामन्यादरम्यान कोणत्याही टप्प्यावर एखाद्या खेळाडूला बाजूला काढून त्याच्या जागी या ५ जणांपैकी एकाला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात घेता येतं. एकदा वगळण्यात आल्यानंतर तो खेळाडू उर्वरित सामन्यात फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करू शकत नाही. इम्पॅक्ट प्लेयर सर्व गोष्टी करू शकतो. सर्वसाधारणपणे पहिला डाव पूर्ण झाल्यानंतर संघ इम्पॅक्ट प्लेयरला समाविष्ट करतात. उदाहरणार्थ प्रथम गोलंदाजी करणारा संघ पहिला डाव संपल्यावर एका गोलंदाजाला वगळून त्याच्या जागी फलंदाजाची निवड करतात. याच धर्तीवर प्रथम फलंदाजी करणारा संघ, पहिला डाव झाला की फलंदाजाला वगळून त्याच्या जागी गोलंदाजाला समाविष्ट करतात.

क्रिकेटच्या मूळ तत्वानुसार, ११ खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध खेळणं अपेक्षित असतं. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे कर्णधार आणि संघव्यवस्थापनाला तांत्रिक गोष्टीही लक्षात ठेवणं आवश्यक झालं आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियमाची चांगली बाजू ही की एखाद्या दमलेल्या गोलंदाजाला बाजूला करून त्याच्याऐवजी ताज्या दमाचा फलंदाज खेळायला उपलब्ध होतो. तसंच मोठी खेळी करून दमलेल्या फलंदाजाला बाजूला करून ताज्यातवान्या गोलंदाजाला समाविष्ट करता येतं. प्रत्येक संघाला आपापल्या आवश्यकतेनुसार अतिरिक्त खेळाडू खेळवण्याचा मुभा आहे. मात्र या नियमाबद्दल उलटसुलट मतमतांतरं आहेत. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट होणारा खेळाडू अचानक कोणत्याही क्षणी मैदानात खेळायला उतरतो. सामन्यात तिथवर त्याचं काहीच योगदान नसतं. खेळपट्टी कशी आहे, वारा कसा आहे, वातावरण कसं आहे याबद्दल तो अनभिज्ञ असतो. बाकीचे ११ खेळाडू खेळून परिस्थितीशी एकरुप झालेले असतात. इम्पॅक्ट प्लेयरला मात्र कधीही खेळण्यासाठी सज्ज राहावं लागतं. या नियमाचा अवलंब केल्यामुळे काही खेळाडू कधीच पूर्ण सामना खेळत नाहीत.

कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असणाऱ्या खेळाडूसाठी हा नियम वरदान ठरू शकतो. मात्र युवा खेळाडूंना संपूर्ण सामना अनुभवण्याची संधीच देत नाही. माजी खेळाडू आणि समालोचक संजय मांजरेकर यांनी या मुद्याकडे लक्ष वेधलं आहे. १५वर्षीय वैभव सूर्यवंशी सलग दुसऱ्या हंगामात मोठमोठ्या गोलंदाजांना चौकार-षटकार लगावत आहे. त्याला रोखायचं कसं हा प्रतिस्पर्धी संघांसमोरचा यक्षप्रश्न आहे. पण ही वैभवची एक बाजू झाली. फलंदाजीनंतर तो क्षेत्ररक्षण कसं करतो, गोलंदाजांना साथ कशी देतो, मैदानावर १०० टक्के झोकून देऊन असतो का हेही महत्त्वाचं आहे असं मांजरेकर यांना वाटतं. चांगला क्रिकेटपटू म्हणून घडण्यासाठी सर्वसमावेशक होणं अत्यावश्यक आहे. वैभव ४० षटकांपैकी २० किंवा त्याहीपेक्षा कमी षटकं खेळत असेल तर त्याला खेळ कसा चालतो ते कसं कळणार, संपूर्ण चित्र समजणार नाही असं मांजरेकर यांना वाटतं.

जी गोष्ट वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत घडते ती काही प्रमाणात पंजाब किंग्जचा सलामीवीर प्रियांश आर्यच्या बाबतीत घडते. बहुतांशवेळा पंजाब किंग्ज संघ युझवेंद्र चहलच्या जागी प्रियांश आर्यला समाविष्ट करतात. युझवेंद्र चहलने ४ षटकांचा स्पेल १६व्या षटकापर्य़ंत संपवला तर प्रियांशला त्याचवेळी समाविष्ट केलं जातं. हेच उलट असेल तर फलंदाजी झाल्यानंतर प्रियांशला वगळून युझवेंद्र चहलला समाविष्ट केलं जातं. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत चहल अव्वल स्थानी आहे. ४ षटकं तसंच एक डाव खेळून चहलचं काम होत आहे. पण प्रियांश निम्माच सामना मैदानात असतो. त्याला संपूर्ण सामना खेळण्याचा अनुभव मिळतच नाही. मांजरेकर म्हणतात त्या धर्तीवर युवा खेळाडूंचा सहभाग फक्त फलंदाजी केली, संपलं इतक्यापुरता असू नये. सामना कसा जिंकला जातो, दडपणाच्या क्षणी गोलंदाजांना साथ कशी द्यायची, संघ म्हणून कामगिरी कशी उंचावायची हे सगळं त्यांना शिकायला मिळतच नाही. त्यामुळे संघांनी इम्पॅक्ट प्लेयरचा नियम वापरताना कोणाची निवड करायची याकडेही लक्ष द्यायला हवं.

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही सामन्यांनंतर दुखापतग्रस्त झाला. फिट होऊन परतल्यानंतर रोहितचं नाव इम्पॅक्ट प्लेयर यादीत होतं. मुंबई इंडियन्स संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यावेळी रोहित संघाचा भाग नव्हता. २० षटकं संपल्यानंतर रोहितला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेण्यात आलं. त्याच्यासाठी सामना तिथून सुरू झाला. रोहित शर्माच्या नेतृत्वातच मुंबईने पाच जेतेपदांवर नाव कोरलं होतं. त्याच्या नेतृत्वातच २०२४ मध्ये भारतीय संघाने टी२० वर्ल्डकप जिंकला होता. त्यामुळे रोहित पटकन या बदलाशी जुळवून घेऊ शकतो. पण बाकी खेळाडू तितक्या सहजतेने हा बदल स्वीकारू शकतील का हा प्रश्न आहे.

वेगवान गोलंदाजांना दुखापतीची समस्या असतात. मार्च-एप्रिल-मे ज्या काळात आयपीएल होतं त्यावेळी प्रचंड उकाडा आणि आर्द्रता असते. अशावेळी वेगवान गोलंदाजाला स्पेलनंतर विश्रांती मिळाली तर ते फायदेशीर ठरू शकतं. उदाहरणार्थ मुंबई इंडियन्सकडे जसप्रीत बुमराहसारखा हुकूमी एक्का आहे. ४ षटकांचा स्पेल झाल्यानंतर त्याच्याऐवजी फलंदाज घेतला जातो. बुमराहसाठी सामना तिथे संपतो, त्याला रिकव्हरीसाठी अतिरिक्त वेळ मिळतो. काही खेळाडू दुखापतीच्या ससेमिऱ्यात अडकलेले असतात. लखनौ सुपरजायंट्सचा मिचेल मार्श हा अष्टपैलू खेळाडू आहे. पण दुखापतीमुळे तो गोलंदाजी करत नाही. त्यामुळे मार्शची फलंदाजी झाली की त्याला वगळून अतिरिक्त गोलंदाज घेतला जातो. मार्श आणि लखनौसाठी हे सोयीचं आहे.

पाच जेतेपदं नावावर असणाऱ्या मुंबईची कामगिरी यथातथाच राहिली. त्यामुळे स्पर्धेतलं त्यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. संघात विस्कळीतपणा किती आहे हे इम्पॅक्ट प्लेयरच्या संदर्भात दिसून आलं. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबईने ऐवजी शार्दूल ठाकूरला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट केलं. बाकी गोलंदाज महागडे ठरत असतानाही कर्णधार हार्दिक पंड्याने शार्दूलला एकही षटक दिलं नाही. भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या शार्दूलकडे आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव आहे. भागीदारी फोडण्यात तो माहीर आहे पण त्याचा विचारच कर्णधाराने केला नाही. बंगळुरूविरुद्धच्या लढतीत रोहित शर्माच्या जागी फिरकीपटू रघू शर्माला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेण्यात आलं. हार्दिकने रघूलाही एकही षटक दिलं नाही.

इम्पॅक्टने दाखवला ‘इम्पॅक्ट’

१ एप्रिल रोजी लखनौ आणि दिल्ली यांच्यात झालेल्या लढतीत इम्पॅक्ट प्लेयर नियमाची ताकद दिसून आली. दिल्लीने लखनौचा डाव १४१ धावांतच गुंडाळला. डावखुरा वेगवान गोलंदाज नटराजनने ४ षटकात २९ धावांच्या मोबदल्यात ३ विकेट्स पटकावल्या. नटराजनऐवजी दिल्लीने समीर रिझवीला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेतलं. समीरने ४७ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ७० धावांची खेळी करत दिल्लीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. समीरलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

मुंबईविरुद्धच्या लढतीत वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने ३ षटकांत २६ धावांत २ विकेट्स टिपल्या. पहिल्या डावानंतर मुकेशऐवजी समीर रिझवीला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेण्यात आलं. समीरने चांगला फॉर्म कायम राखत ५१ चेंडूत ९० धावांची तडाखेबंद खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला.

राजस्थान-गुजरात लढतीत डोनाव्हन फरेरा अवघी एक धाव काढून बाद झाला. राजस्थानने त्याच्या जागी फिरकीपटू रवी बिश्नोईला समाविष्ट केलं. त्याने ४ विकेट्स पटकावत राजस्थानला शानदार विजय मिळवून दिला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

चेन्नई पंजाब सामन्यात पंजाबच्या युझवेंद्र चहलने ३ षटकात २१ धावात १ विकेट पटकावली. त्यानंतर प्रियांश आर्यला समाविष्ट करण्यात आलं. त्या सामन्यात प्रियांशपेक्षा प्रभसिमरन सिंग आणि श्रेयस अय्यर यांनी जास्त धावा केल्या पण आक्रमक पवित्र्याने ११ चेंडूत ३९ धावांची खेळी करणाऱ्या प्रियांशला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. संपूर्ण सामन्यात प्रियांशने २ षटकं क्षेत्ररक्षण केलं तर ११ चेंडू फलंदाजी केली. त्याने त्याचा इम्पॅक्ट दाखवला.

बंगळुरूविरुद्ध राजस्थानने संदीप शर्माऐवजी वैभव सूर्यवंशीला घेतलं. वैभवने २६ चेंडूत ८ चौकार आणि ७ षटकारांसह ७८ धावांची तडाखेबंद खेळी केली. मेख अशी की पहिला डाव संपेपर्यंत वैभवचा सामन्यात काहीही सहभाग नव्हता. शाळकरी वयाचा असूनही त्याला ४० पैकी फक्त २० षटकंच खेळावी लागली. त्यामुळे तो संपूर्ण सामन्यासाठी फिट आहे का हे स्पष्ट झालेलं नाही.

दिल्ली-कोलकाता लढतीत वरुण चक्रवर्तीने ४ षटकात २८ धावा दिल्या. धावांना वेसण घालण्यात तो यशस्वी ठरला पण विकेट मिळाली नाही. कोलकाताने पहिल्या डावानंतर वरुणऐवजी फिन अ‍ॅलनला घेतलं. त्याने ४७ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकारांसह नाबाद १०० धावांची खेळी केली. कोलकाता संघव्यवस्थापनाने ज्या विचाराने त्याला घेतलं होतं तो एकदम यशस्वी ठरला.

५७ सामन्यांपैकी ६ मध्ये इम्पॅक्ट प्लेयरने सामनावीर पुरस्कार पटकावत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. बहुतांश संघ ठराविक पद्धतीनेच इम्पॅक्ट प्लेयरचा वापर करत आहे. काही संघांवर घसरगुंडी झाल्यामुळे फलंदाजांला काढून आणखी एका फलंदाजांना संघात घेण्याची वेळ ओढवली आहे. दोन सामन्यात संघांनी इम्पॅक्ट प्लेयरचा वापरच केलेला नाही.

कर्णधारांच्या बैठकीत इम्पॅक्ट प्लेयर्स नियमावर चर्चा झाली आहे. कर्णधारांनी हा नियम नको अशी भूमिका मांडली. मात्र पुढच्या वर्षीपर्यंत हा नियम लागू असेल असं गव्हर्निंग काऊंसिलने स्पष्ट केलं. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व कमी होतं कारण संघाला अतिरिक्त फलंदाज किंवा गोलंदाज मिळतो. गोलंदाजी करू शकणारा फलंदाज किंवा फलंदाजी करू शकेल असा गोलंदाज असे खेळाडू तयार होणार नाहीत. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगले अष्टपैलू खेळाडू घडणार नाहीत असं कर्णधारांचं म्हणणं होतं. या नियमामुळे तांत्रिकता वाढते असंही कर्णधारांचं म्हणणं आहे.