आयपीएल स्पर्धेत बहुचर्चित असा इम्पॅक्ट प्लेयर नियम निकाली निघण्याची शक्यता आहे. आयपीएल प्रशासनाने यासंदर्भात संकेत दिले आहेत. याबरोबरीने आयपीएलचं ऑक्शन यंदा भारतात होणार आहे. तीन वर्षानंतर ऑक्शनची घरवापसी होणार आहे.

इम्पॅक्ट प्लेयर नियमाअंतर्गत संघांना अतिरिक्त खेळाडू खेळवता येतो. सामन्यात कोणत्याही क्षणी इम्पॅक्ट प्लेयरचा समावेश केला जाऊ शकतो. इम्पॅक्ट प्लेयरचा समावेश केल्यानंतर मूळ खेळाडूला सामन्यात सहभागी होता येत नाही. बहुतांश संघ इम्पॅक्ट प्लेयर नियमचा ठराविक पद्धतीने वापर करतात. मध्यंतराला फलंदाजाऐवजी गोलंदाज किंवा गोलंदाजाऐवजी फलंदाज अशा पद्धतीने इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला जातो.

इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंचं महत्त्व एकदमच कमी झालं. कारण संघांना अतिरिक्त गोलंदाज किंवा अतिरिक्त फलंदाज मिळत असल्याने अष्टपैलू खेळाडूंना अंतिम अकरात खेळवण्याचं प्रमाणही कमी झालं. काही संघांनी इम्पॅक्ट प्लेयरच्या माध्यमातून वयस्क खेळाडूंना खेळवलं. जेणेकरून त्यांना प्रचंड उकाड्यात आर्द्रतेत संपूर्ण ४० षटकं खेळायला लागू नये.

इम्पॅक्ट प्लेयर वापरणं संघांना बंधनकारक नाही. मात्र ही सुविधा असल्याने संघ त्याचा वापर करतात. मात्र इम्पॅक्ट प्लेयरचं गणित डोक्यात ठेवायचं असल्यामुळे डावपेचांची आखणी करणं अवघड होतं असा युक्तिवाद कर्णधार आणि फ्रँचाइजींनी केला आहे. आयपीएलच्या पुढच्या बैठकीत या नियमासंदर्भात चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल.

शुबमन गिल, हार्दिक पंड्या, रोहित शर्मा, अक्षर पटेल या आयपीएल कर्णधारांनी इम्पॅक्ट प्लेयर नियमासंदर्भात मत मांडलं होतं. इम्पॅक्ट प्लेयर नियमासंदर्भात बहुतांश कर्णधार अनुकूल नसल्याचं चित्र आहे. फ्रँचाइजी, प्रशिक्षकांनीही हा नियम नको अशी भूमिका मांडली होती.

२०२७ हंगामासाठी ऑक्शन छोट्या स्वरुपात असणार आहे. ऑक्शन मायदेशी होणार असलं तरी कोणत्या शहराला आयोजनाचा मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. आधीचे तीन ऑक्शन दुबई, जेद्दाह आणि अबू धाबी इथे आयोजित करण्यात आलं होतं. आयपीएलचे चेअरमन अरुण धुमाळ यांनी यासंदर्भात माहिती दिली. १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बीसीसीआयच्या वार्षित बैठकीत धुमाळ यांची पुन्हा एकदा आयपीएल चेअरमनपदी नियुक्ती होणार आहे.

ऑक्शन भारतात व्हावं यासाठी आम्ही अनेक वर्ष प्रयत्नशील आहोत. मात्र ऑक्शन होतं त्या काळात लग्नसराईचा काळ असल्याने आवश्यक सोयीसुविधा असलेलं ठिकाण मिळणं कठीण असतं. त्यामुळे तीन वर्ष ऑक्शन विदेशी झालं होतं. मात्र यंदा ते भारतात होईल.