BCCI On IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेचा थरार सुरू व्हायला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेची सुरूवात होण्याआधी एक नियम तुफान चर्चेत असतो, तो म्हणजे इम्पॅक्ट प्लेअरचा नियम. आगामी हंगाम सुरू होण्याआधी सर्व १० कर्णधार मुंबईत ‘कॅप्टन्स डे’ साठी एकत्र आले होते. यादरम्यान इम्पॅक्ट प्लेअरच्या नियमावरही चर्चा करण्यात आली. आयपीएल २०२३ पासून हा नियम लागू करण्यात आला होता. यावेळीही अनेक कर्णधारांनी या नियमावरून नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या सर्व १० कर्णधारांच्या बैठकीत इम्पॅक्ट प्लेअर नियमावरून चर्चा करण्यात आली. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बऱ्याचशा कर्णधारांनी इम्पॅक्ट प्लेअर नियमानवर आपली प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयने हा नियम २०२७ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पण बहुतांश कर्णधार या नियमाच्या विरोधात असून त्यांनी आक्षेप नोंदवला आहे. पण बीसीसीआयकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, या नियमाचा आढावा २०२७ हंगामानंतरच घेतला जाईल, त्याआधी नाही. आयपीएल २०२४ नंतर हा नियम २०२७ पर्यंत वाढवण्यात आला होता. अनेकांनी हा नियम काढून टाकण्याचीही मागणी केली होती. हा नियम खेळाच्या संतुलनावर परिणाम करत आहे, असं मत अनेक खेळाडूंनी मांडलं आहे.

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार अक्षर पटेलने देखील या नियमावरून नाराजी व्यक्त केली होती. अक्षर पटेलला जेव्हा या नियमाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता, त्यावेळी तो म्हणाला होता, “मला हा नियम मुळीच आवडत नाही. कारण मी अष्टपैलू खेळाडू आहे. आधी आम्ही गोलंदाजी किंवा फलंदाजी करण्यासाठी अष्टपैलू खेळाडूची निवड करत होतो. आता टीम मॅनेजमेंट एकतर गोलंदाज किंवा फलंदाजाची निवड करते. मग आम्हाला अष्टपैलू खेळाडूची काय गरज. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून मला हा नियम नाही आवडत. पण नियम तर नियम आहे, त्याचं पालन तर करावं लागेल.”

केवळ अक्षर पटेल नाही, तर याआधीही अनेक दिग्गज खेळाडूंनी आणि आयपीएल स्पर्धेतील कर्णधारांनी हा नियम काढून टाकण्याची मागणी केली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने देखील इम्पॅक्ट प्लेअर नियमावर आपलं मत मांडलं आहे. रोहितच्या मते, इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे, भारतीय क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूच्या विकासावर फरक पडू शकतो. तर हार्दिक पंड्याने देखील आपलं मत मांडलं होतं. हार्दिक म्हणाला होता की, इम्पॅक्ट प्लेअर नियमामुळे अष्टपैलू खेळाडूंची निवड करणं कठिण होतं.