हंगामातल्या पहिल्याच लढतीत संघाला जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावलेल्या शार्दूल ठाकूरचं काय करायचं यासंदर्भात मुंबई इंडियन्स संघ गोंधळल्याचं चित्र आहे. वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या लढतीत मुंबई इंडियन्स संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. मुंबई इंडियन्सने २४३ धावांचा डोंगर उभारला पण हैदराबादने हे लक्ष्य ८ चेंडू आणि ६ विकेट्स राखून पार केलं. पराभावइतकीच मुंबईच्या अगम्य डावपेचाची चर्चा पाहायला मिळते आहे.
पहिला डाव संपल्यानंतर शार्दूल ठाकूर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून संघात येणं अपेक्षित होतं. नवा चेंडू किंवा पॉवरप्लेच्या षटकात येऊन शार्दूल गोलंदाजी करेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण मुंबई इंडियन्स संघाचे अनाकलनीय डावपेच पाहायला मिळाले. संपूर्ण २० षटकं खेळून शतकी खेळी साकारणारा रायल रिकलटन विकेटकीपिंग करत होता. मुंबईकडे रॉबिन मिन्झच्या रुपात विकेटकीपर होता पण दमलेल्या रिकलटननेच विकेटकीपिंग केलं.
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा जोडीने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये ९२ धावा कुटल्या. हेड-अभिषेकने हैदराबादच्या विजयाचा पाया रचला. मात्र या महत्त्वपूर्ण टप्प्यासाठी शार्दूलला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्टच केलं नाही. अखेर ७व्या षटकात रॉबिन मिन्झऐवजी शार्दूलचा समावेश करण्यात आला. मुंबईचे सगळेच गोलंदाज निष्प्रभ ठरत असतानाही शार्दूलला गोलंदाजीच देण्यात आली नाही. मुंबईच्या कॅम्पमध्ये लसिथ मलिंगा, पारस म्हांब्रे यासारखे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. माहेला जयवर्धने मुख्य प्रशिक्षक आहेत. मात्र कोणालाही शार्दूलसंदर्भात सूचना द्यावी असं वाटलं नाही.
हेड-अभिषेक बाद झाल्यानंतर मुंबईला सामन्यात परतण्याची संधी होती. मात्र हेनरिच क्लासनने वादळी खेळी साकारत मुंबईला परतण्याची संधीच दिली नाही. टीम इंडियाचं प्रमुख अस्त्र असलेल्या जसप्रीत बुमराहच्या ४ षटकात हैदराबादने ५४ धावा लुटल्या. ट्रेंट बोल्टने ४ षटकात ४१ धावा दिल्या. ऑफस्पिनर विल जॅक्सच्या पहिल्या षटकात १९ धावा वसूल झाल्या. युवा अश्वनी कुमारच्या २ षटकात ४१ धावा चोपल्या गेल्या. हार्दिकने एक विकेट पटकावली पण त्याच्या ३.४ षटकात ३९ धावा झाल्या. गनफझरने २ विकेट्स पटकावल्या पण त्याच्या ४ षटकातही ५१ धावांची लूट झाली. असं सगळं असतानाही शार्दूलला गोलंदाजी न देण्याचा निर्णय चक्रावून टाकणारा होता. भागीदारी तोडण्यात शार्दूल माहीर आहे.
आयपीएल स्पर्धेत सात संघांचं प्रतिनिधित्व केलेल्या शार्दूलच्या नावावर ११३ विकेट्स आहेत. वानखेडेचं मैदान शार्दूलला नवीन नाही. १३ वर्षानंतर मुंबईने हंगामातील पहिला सामना जिंकला होता. त्यात शार्दूल सामनावीर ठरला होता. मात्र त्यानंतरही तो संघात नियमित नसल्याने चाहत्यांनी टीका केली आहे. इम्पॅक्ट प्लेयरला गोलंदाजीच देणार नसाल तर मग घेतलंच कशाला असा सवाल चाहत्यांनी केला.
