हौशी खेळाडूंना व्यावसायिक खेळाबाबत प्रोत्साहन मिळावे या दृष्टीने आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगच्या नियमावलीत अनेक बदल करण्यात आले आहेत. खेळाडूंना आता हेडगार्डचा उपयोग न करता ऑलिम्पिकमध्ये लढता येणार आहे. तसेच गुणांकन पद्धतीत व्यावसायिक बॉक्सिंगमधील पद्धतीचा उपयोग केला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने नुकतीच या नियमांमधील बदलांना मान्यता दिली. १९८४ मध्ये लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेच्यावेळी हेडगार्डचा उपयोग अनिवार्य करण्यात आला होता. तेव्हापासून आजपर्यंत ही पद्धत सुरू होती. येत्या ऑक्टोबरमध्ये पुरुषांची जागतिक स्पर्धा होणार आहे. तेव्हापासूनच हेडगार्डची सक्ती काढून टाकण्यात आली आहे. २०१६ च्या ऑलिम्पिकमध्ये खेळाडू हेडगार्डखेरीज रिंगणात उतरतील.
असोसिएशनचे वैद्यकीय समिती प्रमुख चार्ल्स बटलर यांनी सांगितले, हेडगार्ड वापरल्यामुळे खेळाडूंच्या मेंदूच्या दुखापती कमी झाल्याचे कुठेही दिसून आलेले नाही. १९८४ पासून आजपर्यंत हेडगार्डची पद्धत सुरू होती मात्र याबाबत अनेक खेळाडूंनीच नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ठोशाचा चांगला परिणाम दिसून येत नाही व खेळाडू सतत हेडगार्डवर ठोसे मारत बसतात अशी टीका करण्यात आली होती. हेडगार्डपासून गालास संरक्षण मिळत नाही अशीही तक्रार करण्यात आली होती.
सध्या पुरुषांच्या स्पर्धामधून हेडगार्डची अट काढून टाकण्यात आली असली तरी युवा व महिला खेळाडूंना हेडगार्ड वापरणे बंधनकारक राहणार आहे. बॉक्सिंगमधील सध्याच्या गुणांकन पद्धतीवर अनेक खेळाडू व प्रशिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. १९८८ मध्ये सेऊल येथील ऑलिम्पिकच्या वेळी ठोसा मारल्यावर गुण ही पद्धत सुरू करण्यात आली होती. ही पद्धत आता बंद केली जाणार आहे. त्याऐवजी दहा गुणांची पद्धत सुरू केली जाणार आहे.