Imran Tahir World Record in T20 Cricket: वय हा फक्त आकडा असतो, हे क्रिकेटमध्ये खेळाडूंनी अनेकदा सिद्ध केलं आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय दक्षिण आफ्रिकेच्या ४७ वर्षीय माजी खेळाडूने दिला. माजी गोलंदाज इमरान ताहिरने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाचं नेतृत्त्व करत आहे. सेंट ल्युसिया किंग्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या गोलंदाजीच्या कामगिरीद्वारे त्याने विश्वविक्रमाची नोंद केली आहे.

सेंट ल्युसिया किंग्सविरुद्धच्या या सामन्यात, त्याने आपल्या चार षटकांच्या स्पेलमध्ये १७ धावा देत पाच बळी घेतले आणि आपल्या संघाला चार गडी राखून विजय मिळवून देण्यात मदत केली. ५ विकेट्स घेताच त्याने टी-२० क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.पुरुषांच्या टी-२० क्रिकेटच्या इतिहासात एकाच सामन्यात पाच बळी घेणारा इम्रान ताहिर हा आता सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही फ्रँचायझी टी-२० क्रिकेट खेळत असलेला इम्रान ताहिर, कॅरिबियन प्रीमियर लीगच्या २०२६ च्या हंगामात गयाना ॲमेझॉन वॉरियर्सचं नेतृत्व करत आहे. सेंट ल्युसिया किंग्सविरुद्धच्या सामन्यात जेव्हा ताहिरने एका डावात पाच बळी (five-wicket haul) घेतलं, त्याचं वय ४७ वर्षे आणि १६६ दिवस होते; यामुळे पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये पाच बळी घेणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम कुक आयलंड्सच्या टोमाकानुते रितावा यांच्या नावावर होता, ज्यांनी ४६ वर्षे आणि २९९ वय असताना टी-२० क्रिकेटमध्ये पाच बळी घेण्याची कामगिरी केली होती.

पुरुषांच्या टी-२० क्रिकेटमध्ये ५ बळी घेणारे सर्वात वयस्कर खेळाडू

इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) – ४७ वर्षे, १६६ दिवस
टोमाकानुते रितावा (कूक आयलंड्स) – ४६ वर्षे, २९९ दिवस
इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) – ४६ वर्षे, १४८ दिवस
इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) – ४४ वर्षे, ३२३ दिवस
प्रकाश मिश्रा (बल्गेरिया) – ४४ वर्षे, १६५ दिवस
इम्रान ताहिर (दक्षिण आफ्रिका) – ४२ वर्षे, १३५ दिवस

T20 क्रिकेटमध्ये सर्वात वयस्कर खेळाडू म्हणून एकाच सामन्यात पाच बळी (five-wicket haul) घेण्याचा विक्रम ‘आयल ऑफ मॅन’ची क्रिकेटपटू जोआन हिक्स हिच्या नावावर आहे; तिने ५१ वर्षे आणि १७३ दिवस वय असताना ही कामगिरी केली. ग्रीसच्या महिला संघाविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हिक्सने केवळ १० धावांत पाच बळी घेतले. या कामगिरीमुळे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारांत एका सामन्यात पाच बळी घेणारी ती सर्वात वयस्कर खेळाडू ठरली आहे.