चेन्नई सुपर किंग्सचा संघ अरुण जेटली आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायला उतरला आहे. चेन्नईचा या हंगामातला हा दहावा सामना आहे. यंदाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स व्यवस्थापनाने महेंद्रसिंग धोनीसंदर्भात घोषणा केली. पायाच्या दुखापतीमुळे धोनी काही सामने खेळू शकणार नाही असं त्या पत्रकात म्हटलं होतं. वैद्यकीय चमू धोनीच्या दुखापतीकडे लक्ष ठेवून आहे असंही त्या पत्रकात म्हटलं होतं. मात्र धोनी कधी पुनरागमन करणार याविषयी काहीही नमूद करण्यात आलं नव्हतं.

चेन्नईच्या संघाला दुखापतींनी ग्रासलं आहे. धोनीसह नॅथन एलिस, आयुष म्हात्रे, खलील अहमद आणि रामकृष्ण घोष हेही दुखापतग्रस्त झाले. सगळ्यांच्या दुखापती गंभीर स्वरुपाच्या असल्याने यांच्यापैकी कोणीच उर्वरित सामने खेळू शकणार नाही हे स्पष्ट झालं. मंगळवारी होत असलेल्या सामन्यासाठी धोनी दिल्लीत आलेला नाही. धोनी कधी पुनरागमन करणार याबाबत सहाय्यक प्रशिक्षक एरिक सिमन्स यांना विचारलं असता ते म्हणाले, तो माझ्या कामाचा भाग नाही. वैद्यकीय चमू याबाबत सांगू शकेल. धोनी सरावात दिसतो, मात्र सामन्यावेळी मैदानात नसतो याबाबत संघाचे फलंदाजी प्रशिक्षक माईक हसी यांनी माहिती दिली. मी मैदानावर आलो तर विनाकारण लक्ष माझ्यावर केंद्रित होतं.संघातील प्रत्येकजण महत्त्वाचा आहे. संघ चांगली कामगिरी करत आहे. मी नेहमीच संघाबरोबर आहे, प्रत्यक्ष असलोच पाहिजे असं नाही असं धोनी म्हणाला होता.

यंदाचा हंगाम निम्म्यावर आला आहे. चेन्नईचा संघ प्लेऑफसाठी पात्र होऊ शकतो पण हे आव्हान खडतर असणार आहे. १० सामने धोनी खेळलेला नाही. इम्पॅक्ट प्लेयरच्या यादीतही त्याचं नाव नसतं. अचानक हंगामाच्या मध्येच तो खेळायला उतरेल का याविषयी साशंकता आहे. धोनीच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनने विकेटकीपिंगची जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आहे. ऋतुराजकडे नेतृत्वाची धुरा आहे. सुरुवातीला चाचपडल्यानंतर चेन्नईला आता सूर गवसला आहे.

आयपीएलचा हा १९वा हंगाम आहे. सगळे हंगाम खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या फक्त ४ आहे. यामध्ये महेंद्रसिंग धोनीसह विराट कोहली, रोहित शर्मा आणि मनीष पांडे यांचा समावेश आहे. विराट आरसीबी खेळतो आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला मात्र सोमवारी त्याने पुनरागमन केलं. मनीष पांडे कोलकाता नाईट रायडर्स संघात आहे. धोनी चेन्नईच्या संघात आहे मात्र तो डगआऊटमध्ये असत नाही. तो सराव करतो पण सामन्यावेळी नसतो. मंगळवारी तर तो दिल्लीतच आला नाही.

आयपीएलच्या यशात आणि लोकप्रियतेत धोनीचा वाटा सिंहाचा आहे. धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिलावहिला टी२० वर्ल्डकप जिंकला होता. या यशामुळेच आयपीएल आयोजनाचा मार्ग सुकर झाला. पहिल्या हंगामापासून धोनी आणि चेन्नई सुपर किंग्स हा ऋणानुबंध पक्का झाला.धोनीच्या नेतृत्वातच चेन्नई सुपर किंग्स संघाने तब्बल पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं. आयपीएल स्पर्धेच्या माध्यमातून फिनिशर धोनीची ताकद सातत्याने दिसली.

धोनी १८ वर्षात किती सामने खेळू शकला नाहीये ते जाणून घेऊया. धोनी खेळू शकला नाही असं २०१९ हंगामात झालं होतं. २६ एप्रिल २०१९ रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध झालेल्या सामन्यात धोनी खेळू शकला नव्हता. ताप असल्यामुळे धोनी खेळला नाही. त्याच्या अनुपस्थितीत सुरेश रैनाने संघाचं नेतृत्व केलं होतं.

त्याच हंगामात १७ एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत धोनी पाठीच्या दुखण्यामुळे खेळू शकला नाही. प्रदीर्घ अशा कारकिर्दीत धोनी केवळ पाच सामने खेळू शकला नाहीये. चेन्नई सुपर किंग्स संघाने २००८ ते २०२५ कालावधीत २५३ सामने खेळले आहेत. यापैकी फक्त ५ सामन्यात धोनी खेळू शकला नाही.

२०१० हंगामात धोनी तीन सामने खेळला नव्हता. दिल्ली डेअरडेव्हिल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध धोनी एकेक सामना खेळू शकला नव्हता.

फिक्सिंगच्या आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्स संघावर कारवाई झाली. दोन वर्ष चेन्नई संघावर बंदी घालण्यात आली. दोन वर्षांकरता धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून खेळला. नव्या संघासाठी खेळतानाही धोनीने सगळे सामने खेळले. यंदाचा हंगाम मात्र सगळ्याला अपवाद ठरला आहे. १८ वर्षात धोनीने चेन्नई आणि पुणे संघासाठी मिळून २७८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याच्या नावावर ५४३९ धावा असून त्याचा स्ट्राईकरेट १३७.४५ आहे. धोनीच्या नावावर २४ अर्धशतकं आहेत आणि १०० वेळा तो नाबाद राहिला आहे. यातूनच त्याचं फिनिशर म्हणून कौशल्य सिद्ध होतं.

भारतीय संघासाठी टेस्ट, वनडे आणि टी२० असं सगळं खेळत असतानाही आयपीएलमध्ये सगळे सामने खेळण्याचं आव्हान धोनीने वर्षानुवर्ष सांभाळलं. चाळिशीपल्याड गेलेल्या धोनीला आता मात्र दुखापतींनी सतवलं आहे. गेल्या काही हंगामांपासून धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू होतात. यंदाचा हंगामही त्याला अपवाद नाही.

धोनी आयपीएलमध्ये वर्षनिहाय
२००८- १६
२००९- १४
२०१०- १३
२०११- १६
२०१२- १९
२०१३- १८
२०१४- १६
२०१५- १७
२०१६- १४
२०१७- १६
२०१८- १६
२०१९- १५
२०२०- १४
२०२१- १६
२०२२- १४
२०२३- १६
२०२४- १४
२०२५- १४