पुढच्या दोन दिवसात २०१८ गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होणार असून २२५ सदस्यांच्या भारतीय पथकाकडून पदकाच्या भरपूर अपेक्षा आहेत. ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धांचा विचार करता भारताने नेहमीच राष्ट्रकुलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मागच्या तीन राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने २१५ पदके मिळवली आहेत. २००६ मध्ये ५०, २०१० मध्ये १०१ आणि २०१४ मध्ये ६४ पदके भारतीय क्रीडापटूंनी मिळवली आहेत. बॅडमिंटन, नेमबाजी, बॉक्सिंग आणि वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारातून भारताला सर्वाधिक पदकांची अपेक्षा आहे. भारताच्या २२५ सदस्यांच्या पथकात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण आहे.

१) पी.व्ही. सिंधू सध्याच्या घडीला भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू आहे. ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सिंधूने बॅडमिंटनच्या जागतिक चॅम्पिनशिप स्पर्धेतही दोनवेळा पदकविजेती कामगिरी केली आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूकडून राष्ट्रकुल २०१८ मध्ये सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

२) साक्षी मलिक आजच्या घडीला भारताची अव्वल महिला कुस्तीपटू आहे. चार वर्षांपूर्वी ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत तिने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. दोन वर्षांपूर्वी रियो ऑलिम्पिकमध्ये साक्षीने भारताला कांस्यपदक मिळवून दिले. ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये पदक मिळवणारी साक्षी पहिली भारतीय महिला आहे. तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे.

३) पुरुषांच्या भालाफेकमध्ये नीरज चोप्रा भारताचे आशास्थान आहे. २०१७ मध्ये २० वर्षांच्या नीरज चोप्राने आशियाई अॅथलॅटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ८५.२३ मीटर अंतरावर भालाफेक करुन सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती. त्यानंतर एशियन ग्रँण्ड प्रिक्समध्ये त्याने रौप्यपदक मिळवले. ज्यूनियर स्तरावर भालाफेकीचा विश्व विक्रम नीरजच्या नावावर आहे. भविष्यातील अशा स्थान असलेल्या नीरज चोप्राकडून भारताला भरपूर अपेक्षा आहेत.

४) बॉक्सिंगच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने दमदार कामगिरी करणाऱ्या मेरी कोमकडून भारताला पदकाची आस आहे. अनेक जागतिक बॉक्सिंग स्पर्धांची विजेतेपद नावावर असणाऱ्या मेरी कोमने ऑलिम्पिकमध्येही कांस्यपदक विजेती कामगिरी केली आहे. राष्ट्रकुल ही ३५ वर्षाच्या मेरी कोमसाठी शेवटची स्पर्धा असू शकते.

५) बॅडमिंटनमध्ये सिंधूच्या बरोबरीने सायनाकडूनही भारताला पदकाच्या अपेक्षा आहेत. ऑलिम्पिकपदकासह बॅडमिंटनच्या वेगवेगळया आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या सायनाने २०१७ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले तसेच राष्ट्रीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने सिंधूचा २१-१७,२७-२५ असा पराभव केला होता.

६) ऑल्मिपक, आशियाई आणि राष्ट्रकुल या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदकांची सर्वाधिक अपेक्षा नेमबाजीकडून असते. भारतीय नेमबाजांची कामगिरी सुद्धा तशीच आहे. राष्ट्रकुलमध्ये भारतीय नेमबाज तर पदकांची लयलटू करतातय. नेमबाजीत जीतू राय भारताचे आशास्थान आहे. ३० वर्षीय जीतू ५० मीटर पिस्तुल आणि १० मीटर एअर पिस्तुलमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

७) पुरुष बॅडमिंटनपटूंमध्ये किंदबी श्रीकांतकडून सर्वाधिक पदकाची अपेक्षा आहे. मागच्या वर्षभरात आपल्या कामगिरीने श्रीकांतने त्याच्याविषयीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. इंडोनेशिया ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, डेन्मार्क ओपन आणि फ्रेंच ओपन या महत्वाच्या स्पर्धांचे जेतेपद त्याने मिळवले आहे.

८) वेट लिफ्टिंगमध्ये संजिता चानूकडून भारताला अपेक्षा आहे. ग्लासगो राष्ट्रकुलमध्ये तिने सुवर्णपदक विजेती कामगिरी केली होती.

९) मेहुली घोष भारतीय पथकातील सर्वात तरुण सदस्य आहे. वयाच्या १७ वर्षी ती नेमबाजीत ती भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. मेक्सिकोत झालेल्या आयएसएसएफ वर्ल्डकप स्पर्धेत तिने कांस्यपदक विजेती कामगिरी केली होती. १० मीटर एअर रायफलमध्ये ती उतरणार आहे. मागच्या सहा महिन्यात तिने दमदार कामगिरी केली आहे.

१०) पुरुष बॉक्सिंगमध्ये विकास कृष्णनकडून भारताला पदकाच्या अपेक्षा ठेवता येतील. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणाऱ्या विकासचे २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत उपांत्यपूर्वफेरीत आव्हान संपुष्टात आले होते. कॉमनवेल्थमध्ये त्याच्याकडून पदकाची अपेक्षा आहे.