आयपीएलचा हंगाम निम्म्यावर आला आहे. यंदाच्या हंगामाचा ट्रेंड म्हणजे सातत्याने दोनशेपार जाणारी धावसंख्या आणि षटकार-चौकारांचा ढीग. यंदाच्या हंगामात ३८ सामन्यांमध्ये ३१ वेळा संघांनी दोनशेची वेस ओलांडली आहे. विशेष म्हणजे धावांचा पाठलाग करतानाही संघ दोनशे धावा सहजतेने करत आहेत.
कोणत्याही स्पर्धेत बॅट आणि बॉलमधला मुकाबला रंगणं अपेक्षित असतं. यंदाच्या हंगामात मात्र फलंदाज गोलंदाजांना बुकलून काढत असल्याचं चित्र आहे. मैदानात यायचं, धावा होताना पाहायचं आणि पैसे मिळतात म्हणून खेळत राहायचं अशीच गोलंदाजांची मानसिकता होऊ शकते.
पहिल्या डावात धावसंख्येचा डोंगर रचणं असो किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग असो- गोलंदाज मोठ्या वजनी आकाराच्या बॅटचा तडाखा सोसत आहेत. १२० चेंडूत १५०-१६० धावा होणं साहजिक होतं. कारण टी२० प्रकारात फटकेबाजीवर भर असतो. या हंगामात २०० पार होणं सर्वसाधारण होऊन गेलं आहे. एवढ्या धावा करूनही पुरत नसल्याने संघांसमोरचा पेच वाढला आहे.
हंगामागणिक आढावा घेतला तर दोनशे धावा करण्याचं प्रमाण काही पटीत वाढलं आहे. २००८ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या हंगामात २०० पेक्षा जास्त धावसंख्या संपूर्ण हंगामात फक्त ११ वेळा नोंदली गेली. आयपीएलच्या पहिल्यावहिल्या लढतीत ब्रेंडन मॅक्युलमच्या वादळी शतकी खेळीच्या बळावर कोलकाताने दोनशेची वेस ओलांडली होती. पहिल्याच सामन्यात दोनशे होऊनही तो पायंडा कायम झाला नाही. गोलंदाजांना त्यांचं कौशल्य दाखवण्याची थोडीतरी संधी मिळाली.
आफ्रिकेत धावांना लागला ब्रेक
दुसऱ्या हंगामात चित्र पूर्णत: बदललं. २००९ मध्ये देशभरात होणार असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे संपूर्ण हंगाम दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आला. साहजिकच खेळपट्ट्यांचं स्वरुप पूर्णत: पालटलं. आयपीएलमध्ये चौकार-षटकारांची लयलूट व्हावी यादृष्टीने पाटा विकेट तयार केल्या जातात. दक्षिण आफ्रिकेत मात्र तसं झालं नाही. निवडणुकांमुळे निम्मा हंगाम भारतात, निम्मा आफ्रिकेत घेण्याचं प्रयोजन होतं. मात्र निवडणुकांमध्ये सुरक्षायंत्रणा व्यग्र राहणार असल्याने संपूर्ण हंगाम आफ्रिकेत खेळवण्याचा निर्णय झाला. या हंगामात फक्त एकदा दोनशेची वेस ओलांडली गेली. ५९ सामन्यांमध्ये फक्त एकदा यावरून तिथल्या खेळपट्ट्यांवर धावा करणं भारतीय फलंदाजांना सोपं गेलं नाही हे स्पष्ट झालं. किंग्समीड, डरबान इथे झालेल्या अपवादात्मक लढतीत राजस्थान रॉयल्सने २११ धावांची मजल मारली. योगायोग म्हणजे दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथने म्हणजे स्थानिक खेळाडूनेच सर्वाधिक ७७ धावा केल्या होत्या. नमन ओझाने ६८ धावा करत त्याला चांगली साथ दिली. प्रत्युत्तरादाखल खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) संघाला १३३ धावाच करता आल्या.
मायदेशी सुसाट
२०१० मध्ये आयपीएलचा ताफा मायदेशी परतला. पण त्यावर्षीही १०वेळाच दोनशेची वेस ओलांडली गेली. गंमत म्हणजे पुढच्या दोन हंगामात दोनशेची हौस फिटली आणि २०११ आणि २०१२ हंगामात फक्त ५ वेळा दोनशे धावा झाल्या. २०१३ मध्ये तर हे प्रमाण आणखी घटलं आणि दोन महिन्यात फक्त ४ वेळा दोनशेचा टप्पा संघांनी ओलांडला. २०१४ मध्ये हे प्रमाण वाढून ९ पर्यंत गेलं. वर्षभरात म्हणजे २०१५ मध्ये पुन्हा घटून ७वर आलं. २०१६ मध्ये मुंबई-चेन्नईची सद्दी मोडत सनरायझर्स हैदराबादने जेतेपद पटकावलं. त्यावर्षी गोलंदाजांना सहाय्यकारी खेळपट्ट्या होत्या. फक्त ६ वेळा दोनशे झाल्या.
२०१७ मध्ये नऊ वर्षानंतर पहिल्यांदाच दोनशे धावसंख्येने दुहेरी टप्पा ओलांडला. १० वेळा दोनशेची वेस ओलांडली गेली. पुढच्या वर्षी प्रमाण वाढून १४ झालं आणि २०१९ मध्ये घसरून ११वर आलं. कोरोना काळात २०२० मध्ये आयपीएलचं वेळापत्रक बदललं. एप्रिल-मे ऐवजी सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये ही स्पर्धा युएईत झाली. शारजातल्या छोट्या मैदानाचा फायदा संघांनी घेतला आणि १३ वेळा दोनशेचा टप्पा पार केला. २०११चा हंगाम दोन टप्प्यात झाला. कोरोना काळात असल्यामुळे सगळे संघ बायोबबलमध्ये होते. मात्र स्पर्धा सुरू असतानाच खेळाडू तसंच सपोर्ट स्टाफ यांना कोरोना संसर्गाच्या घटना वाढल्यामुळे अखेर हंगाम स्थगित करण्यात आला. उर्वरित हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत खेळवण्यात आला. आव्हानात्मक अशा वातावरणात झालेल्या या हंगामात फक्त ९ वेळा दोनशेपेक्षा जास्त धावा झाल्या.
दणकून दोनशे
२०२२ मध्ये आयपीएल मायदेशी परतलं मात्र कोरोनाचा धोका लक्षात घेऊन मुंबईपुण्यातच सामने खेळवण्यात आले. घरच्या मैदानावर खेळपट्ट्यांवर खेळायचा परिणाम लगेचच दिसून आला आणि आधीच्या हंगामाच्या तुलनेत दोनशे करण्याचं प्रमाण दुपटीने वाढलं. १८ वेळा दोनशेची वेस पार झाली. यानंतरचे हंगाम मात्र गोलंदाजांसाठी कत्तलच ठरू लागले. २०२३ मध्ये ३७ तर २०२४ मध्ये ४१ वेळा दोनशे झाल्या. हे कमी की काय म्हणून गेल्या वर्षी २०२५ हंगामात तब्बल ५२ वेळा धावसंख्या दोनशेपल्याड गेली. बाऊन्सवर मर्यादा तसंच बाकीही कठोर नियमांमुळे गोलंदाज शस्त्रहीन आणि दुसरीकडे फलंदाजांना मात्र सगळी सूट मिळते आहे. बॅटचा आकार वाढला आहे. बाकही वाढला आहे. खेळताना स्टान्समध्ये बदल करता येतो आहे. मैदानांचा आकार लहान आहे, त्यात भर म्हणजे बाऊंड्री आत आणली जाते. खेळपट्ट्या पाटा स्वरुपाच्या आहेत.
तंत्रात उणिवा; टेस्ट खेळणं अवघड
या अशा खेळपट्ट्यांवर खेळण्याची सवय झाल्यानंतर संयमाने खेळणं कठीण होऊ शकतं असा इशारा अनेक माजी खेळाडूंनी दिला आहे. आयपीएल खेळणारे बहुतांश खेळाडू टेस्ट प्रकारातही खेळतात. चेंडू सोडून देणे, चांगल्या चेंडूचा सन्मान करणे या गोष्टी दुर्मीळ होत चालल्याचं निरीक्षण तज्ज्ञ मंडळी नोंदवत आहेत. प्रत्येक चेंडूवर चौकार-षटकार मारणं अनिवार्य केल्यासारखं खेळाडू खेळतात. पाटा खेळपट्टीवर मनमुराद फटकेबाजी करता येते पण चेंडू स्विंग होतो किंवा वळतो अशा आव्हानात्मक खेळपट्ट्यांवर फलंदाजांचं तंत्र उघडं पडत असल्याचं दिसत आहे. आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा करणारे फलंदाजांची चांगल्या खेळपट्टीवर फेफे उडते असंही चित्र आहे.
दोनशे धावा होणं यातलं नाविन्य किंवा अनोखेपण संपून गेलं आहे. अडीचशेचा टप्पाही भेदला जातो आहे. येत्या काही दिवसात आयपीएल स्पर्धेत एखाद्या संघाने तीनशेचा टप्पा ओलांडला तर आश्चर्य वाटणार नाही. तीनशे करूनही त्यांना जिंकण्याची खात्री नसेल ही काळजीत टाकणारी गोष्ट आहे.
दोनशे सातत्याने होत असल्याने गोलंदाजांचे स्पेल केविलवाणे ठरत आहेत. चार षटकात ६०पेक्षा धावा कुटल्या जात आहेत. गेल्याच वर्षी जोफ्रा आर्चरसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गोलंदाजाला नामुष्कीला सामोरं जावं लागलं. आर्चरच्या ४ षटकात हैदराबादच्या फलंदाजांनी ७६ धावा लुटल्या.
हंगामागणिक दोनशे धावसंख्या कितीवेळा
२००८-११
२००९-१
२०१०-९
२०११-५
२०१२-५
२०१३- ४
२०१४- ९
२०१५- ७
२०१६-६
२०१७- १०
२०१८- १४
२०१९- ११
२०२०- १३
२०२१-९
२०२२- १८
२०२३- ३७
२०२४- ४१
२०२५-५२
