इन्चॉन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय क्रीडापटूंची कामगिरी प्रेरणादायी अशीच आहे, असे उद्गार केंद्रीय क्रीडामंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी काढले. क्रीडा मंत्रालयातर्फे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.
भारताने या स्पर्धेत ११ सुवर्णासह एकूण ५७ पदकांची कमाई केली. सुवर्णपदकविजेत्यांना प्रत्येकी २० लाख रुपयांनी गौरवण्यात आले तर रौप्यविजेत्यांना प्रत्येकी १० आणि कांस्यपदक विजेत्यांना प्रत्येकी ६ लाख रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.
‘‘आशियाई क्रीडा स्पर्धेत अव्वल खेळाडूंना टक्कर देत भारतीय खेळाडूंनी केलेले प्रदर्शन प्रेरणादायी आहे. ज्या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे, त्यांनी ते कायम राखण्यासाठी प्रयत्नशील असावे आणि रिओ ऑलिम्पिकसाठी कसून मेहनत करावी. ज्यांनी रौप्य आणि कांस्यपदक मिळवले आहे त्यांनी पदकाचा रंग बदलण्यासाठी प्रयत्न सुरू करावेत,’’ असे सोनोवाल यांनी सांगितले.
राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीत १६ वर्षांनंतर मिळालेल्या पदकाने या खेळाला नवसंजीवनी मिळाली आहे. संपूर्ण देशातर्फे तुम्हाला सलाम!, अशा शब्दांत सोनोवाल यांनी सुवर्णपदक विजेत्या हॉकी संघाचे कौतुक केले. आगामी स्पर्धाच्या सरावासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी साहाय्य मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात खेळाच्या विकासासाठी पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. रिओ ऑलिम्पिकच्या दृष्टीने संभाव्य पदक विजेत्या अशा १५० खेळाडूंची सरकार निवड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘‘पदकापेक्षाही आशियाई स्पर्धेसाठी पात्र होऊन खेळणे मोठे यश आहे. देशाचा झेंडा हाती धरावा आणि त्यावेळी आपले राष्ट्रगीत सुरू व्हावे, असे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार झाल्याचा आनंद अनोखा आहे,’’ अशा शब्दांत सानिया मिर्झाने आपला आनंद व्यक्त केला.
स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव शिबिराच्या वेळी आम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल भारतीय हॉकी संघाचा कर्णधार सरदारा सिंगने संघटना, साइ आणि क्रीडा मंत्रालयाचे आभार मानले. ‘‘यापुढे जास्तीत जास्त पदक पटकावण्याचा प्रयत्न असेल,’’ असे सरदाराने सांगितले.
‘‘मी भाषण करण्यात पटाईत नाही. पण पदकाने मला अतिशय आनंद झाला. मी खूप घाबरले होते. मला कोणते पदक मिळेल, याची हुरहूर होती. प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करताना सुवर्णपदक पटकावता आल्याने समाधान वाटले,’’ असे मेरीने सांगितले.