India A vs South Africa A, 1st unofficial Test Match: ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील भारत अ संघाने शानदार विजय नोंदवला. बेंगळुरूमध्ये झालेल्या पहिल्या अनधिकृत सामन्याच्या अखेरच्या दिवशी, यजमान संघाने दक्षिण आफ्रिका अ संघाचा तीन विकेट्सने पराभव केला. यासह दोन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने १-० अशी आघाडी घेतली. कर्णधार ऋषभ पंतसह अष्टपैलू तनुष कोटियन आणि अंशुल कंबोज यांनी चेंडू आणि बॅटने उत्कृष्ट कामगिरी केली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या ऋषभ पंतने .या सामन्यात ९० धावांची शानदार खेळी केली. त्याच्या या खेळीसह भारताच्या विजयाची दिशा निश्चित केली. पण अवघ्या १० धावांनी त्याचं शतक हुकलं.
२७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग अखेरच्या दिवशी भारत अ संघ अडचणती होता. यजमान संघाने २१५ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर अंशुल कंबोज आणि मानव सुथार यांनी सातव्या विकेटसाठी नाबाद ६२ धावांची भागीदारी करून संघाला शानदार विजय मिळवून दिला. अंशुल कंबोजने ४६ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या. मानव सुथारने ५६ चेंडूत तीन चौकारांसह नाबाद २० धावा केल्या.
तनुष कोटियनने ३० चेंडूत दोन चौकारांसह २३ धावा केल्या. कर्णधार ऋषभ पंतनेही ११३ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांसह ९० धावा काढल्या. आयुष बदोनी ३४ धावा करून बाद झाला. दक्षिण आफ्रिकेकडून तियान व्हॅन वुरेनने तीन विकेट्स घेतल्या. त्शेपो मोरेकीने दोन विकेट्स घेतल्या. या सामन्यात तनुष कोटियनने शानदार कामगिरी केली.
तनुष कोटियनने या सामन्यात बॅट आणि बॉल दोन्हीने उत्कृष्ट कामगिरी केलीय. या सामन्यात त्याने एकूण ८ विकेट्स घेतल्या. पहिल्या डावात त्याने १३ आणि दुसऱ्या डावात २३ धावा केल्या. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. तर अंशुल कंबोजने दोन्ही डावांमध्ये मिळवून ४ विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात दक्षिण आफ्रिका अ संघाने ३०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, यजमान संघ फक्त २३४ धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावात, पाहुण्या संघाला टीम इंडियाने १९९ धावांवर सर्वबाद केलं. यासह, भारत अ संघासमोर विजयासाठी २७५ धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी ७ गडी गमावून पूर्ण केलं.
