INDA vs UAE Asia Cup Rising Star 2025: आशिया चषक रायझिंग स्टारमधील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने मोठा विजय मिळवला आहे. भारताच्या अ संघाने वैभव सूर्यवंशी व कर्णधार जितेश शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर युएई संघावर तब्बल १४८ धावांनी विजय मिळवला. गोलंदाजीत गुर्जपनीत सिंगने ३ विकेट्स घेतल्या. तर भारताच्या इतर गोलंदाजांनीही त्याला चांगली साथ दिली. भारताचा आता पुढील सामना पाकिस्तान अ संघाविरूद्ध होणार आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. वैभव सूर्यवंशीचं शतक व जितेश शर्माच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताने २० षटकांत ४ बाद २९७ धावा केल्या. प्रत्युत्तरात युएईचा संघ ६ बाद १५० धावाच करू शकला. यासह भारताने १४८ धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली.
युएईचा संघ २९८ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरला. युएईच्या सलामीवीरांना हर्ष दुबे व गुर्जपनीत सिंगने माघारी धाडलं. तर सोहेब खानने ४१ चेंडूत ३ चौकार, ६ षटकारांसह ६३ धावांची झटपट खेळी केली. याशिवाय कोणताच फलंदाज ३० धावाही करू शकला नाही. भारताकडून गुर्जपनीत सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. गुर्जपनीतने ४ षटकांत १८ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तर हर्ष दुबेने २ विकेट्स आणि रमणदीप, यश ठाकूरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाने २९७ धावांचा डोंगर उभारला. वैभव सूर्यवंशीने एकट्याने १४४ धावांची खेळी केली. वैभवने ३२ चेंडूत शतक झळकावल्यानंतर ४२ चेंडूत ११ चौकार व १५ षटकारांसह १४४ धावा केल्या. यानंतर नमन धीरने २३ चेंडूत ३ चौकार, २ षटकारांसह ३४ धावांची खेळी केली. तर कर्णधार जितेश शर्माने ३२ चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांसह झटपट ८३ धावा करत संघाला मोठी धावसंख्या गाठण्यात मदत केली. याशिवाय भारताकडून नेहाल वधेराने १४ धावा, रमणदीपने नाबाद ६ धावा व प्रियांश आर्यने १० धावा केल्या.
आशिया चषक रायझिंग स्टार २०२५ मध्ये भारताचा पुढील सामना पाकिस्तान अ संघाविरूद्ध होणार आहे. हा सामना १६ नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.
