IND A beat USA T20 WC Warm Up Match: भारताच्या अ संघाने टी-२० विश्वचषक २०२६ वॉर्म अप सामन्यात अमेरिकेवर ३८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने अमेरिकेला १९.४ षटकांत २०० धावांवर सर्वबाद केलं. भारताने अमेरिकेला विजयासाठी २० षटकांत २३९ धावांचं आव्हान दिलं होतं. याशिवाय तिलक वर्माने दुखापतीतून सावरल्यानंतर अष्टपैलू कामगिरी करत फॉर्म सिद्ध केला आहे.
टी-२० विश्वचषक २०२६ ला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारतीय संघ अमेरिकाविरूद्ध सामन्याने सुरूवात करणार आहे. तत्पूर्वी अमेरिकेचा संघ सराव सामना खेळत आहे. तिलक वर्माला न्यूझीलंडविरूद्ध टी-२० मालिकेपूर्वी दुखापत झाल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामुळे तो पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला मुकला होता. पण आता टी-२० विश्वचषकापूर्वी त्याने फिटनेस परत मिळवला असून तो सराव सामना खेळत आहे. या सराव सामन्यात त्याने आपला फिटनेस आणि फॉर्म दोन्ही सिद्ध केलं आहे.
भारताने दिलेल्या २३९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाची सुरूवात चांगली झाली पण रवी बिश्नोईने मोनांक पटेलला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर अँड्रियू गसने ३१ चेंडूत ५ चौकार व एका षटकारासह ४४ धावांची खेळी केली. तर साईतेजा मुक्कामल्ला शून्यावर परतला. तर मिलिंद कुमार १८ धावा करत बाद झाला. मिलिंद कुमारला झेलबाद करण्यासाठी तिलक वर्माने कमालीचा रनिंग झेल टिपला. संजय कृष्णमृतीने १८ चेंडूत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावा केल्या. हरमीत सिंग ९ चेंडूत २५ धावा बाद झाला.
भारताकडून फिरकीपटू रवी बिश्नोईने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. खलील अहमदने २ विकेट्स, अशोक शर्मा व तिलक वर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या. तर अखेरच्या २०व्या षटकात नमन धीरने २ विकेट्स घेत अमेरिकेला सर्वबाद केलं.
सराव सामन्यात एन जगदीशनचं ५५व्या चेंडूत शतक
भारताच्या अ संघाने फलंदाजीत वादळी कामगिरी केली. अमेरिकेने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताकडून प्रियांश आर्य व एन जगदीशनची जोडी सलामीला उतरली होती. प्रियांश व जगदीशन यांनी संघाला शानदार सुरूवात करून देत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. प्रियांश आर्या १३ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह २८ धावा केल्या. एन जगदीशनने सराव सामन्यात ५५ चेंडूच ११ चौकार व ४ षटकारांसह १०४ धावांची शतकी खेळी केली. यानंतर तिलक वर्माने २४ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ३८ धावा करत आपला फॉर्म सिद्ध केला. कर्णधार आयुष बदोनीने २६ चेंडूत६ चौकार व ४ षटकारांसह ६० धावांची नाबाद खेळी केली.

