भारताने तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदर भारताच्या या विजयाचा हिरो ठरला. वॉशिंग्टनने जितेश शर्माबरोबर ४० धावांची भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंगने ३ विकेट्स घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली. यासह भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ सामन्यांची टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत आहे.

दुसऱ्या टी-२० सामन्यातील पराभवानंतर तिसऱ्या सामन्यासाठी भारताने प्लेईंग इलेव्हनमध्ये ३ मोठे बदल केले. हर्षित राणाच्या जागी अर्शदीप सिंगला, कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला तर संजू सॅमसनच्या जागी जितेश शर्माला संधी दिली. या तिन्ही खेळाडूंनी या सामन्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १८७ धावांच्या प्रत्युत्तरात भारताने सावध सुरूवात केली. अभिषेक शर्माने आपल्या वादळी फटकेबाजीच्या अंदाजात सामन्याला सुरूवात केली. अभिषेक २५ धावा तर गिल १५ धावा करत बाद झाला. तिसऱ्या सामन्यातही गिल फारशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही. तर सूर्यकुमार यदव २४ धावा, तिलक वर्मा २९ धावा आणि अक्षर पटेल यांनी १७ धावांचे योगदान दिले. तर वॉशिंग्टन सुंदरने २३ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारासह ४९ धावांची खेळी केली. तर जितेश शर्माने १३ चेंडूत ३ चौकारांसह २२ धावांची शानदार खेळी केली आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तर ऑस्ट्रेलियाने फलंदाजीने सामन्याला सुरूवात करत २० षटकांत ६ बाद १८६ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून टीम डेव्हिड व मार्कस स्टॉयनिस यांनी वादळी खेळी केली. टीम डेव्हिडने ३८ चेंडूत ८ चौकार व ५ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली. तर स्टॉयनिसने ३९ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांसह ६४ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर मॅथ्यू शॉर्टने २६ धावांची खेळी केली. तर भारताकडून अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ विकेट्स, वरूण चक्रवर्तीने २ तर शिवम दुबे १ यांनी विकेट्स घेतल्या.