भारतीय संघाने बांगलादेशवर थरारक विजय मिळवला. टीम इंडियाने अक्षरश: बांगलादेशच्या जबड्यातून विजय हिसकावून घेत १८ धावांनी दणदणीत विजयाची नोंद केली. आयुष म्हात्रेची चाल, विहान मल्होत्राची उत्कृष्ट गोलंदाजी अन् वैभव सूर्यवंशीचा सीमारेषेवर अफलातून झेल हे या विजयाचे हायलाईट्स ठरले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील अंडर-१९ विश्वचषक सामन्यात ढगाळ वातावरण होतं आणि पावसामुळे दोन वेळा सामना थांबवण्यात आला. दुसऱ्यांदा सामना थांबवण्यात आला, तेव्हा २९ षटकांचा सामना करण्यात आला आणि बांगलादेशला विजयासाठी १६५ धावांचं आव्हान देण्यात आलं.
बांगलादेशचा संघ २ विकेट्स गमावत सहज धावा करत होता. पण तितक्यात आयुष म्हात्रेने मोठा डाव खेळला. कर्णधार आयुष म्हात्रेने २२ व्या षटकात उपकर्णधार विहान मल्होत्राला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. विहानने दुसऱ्याच चेंडूवर सिद्दीकीला झेलबाद केलं. यानंतर २४व्या षटकात शेख पवेजला झेलबाद केलं. २६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने बसीर रतुलला झेलबाद केलं. या विकेटमध्ये वैभव सूर्यवंशीचं मोठं योगदान आहे, ज्याने उत्कृष्ट झेल टिपला. यानंतर २८व्या षटकातील त्याच्या पहिल्याच चेंडूवर अल फहाद धावबाद झाला आणि तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकार लगावलेल्या रिझानल झेलबाद केलं.
बांगलादेशला पहिल्याच षटकात विकेटचा धक्का बसला. यानंतर रिफत बेग व कर्णधार तमिमने संघाचा डाव सावरला. रिफत ३७ धावा करत बाद झाला. २ विकेट्सवर ९३ धावा अशी संघाची स्थिती असताना पावसाने हजेरी लावली. ब्रेकनंतर संघाला ७५ चेंडूत ७० धावा करायच्या होत्या. पण भारताच्या खेळाडूंनी मात्र धावा करू दिल्या नाहीत. विहान मल्होत्राने सिद्दीकीला बाद केलं आणि बांगलादेशने विकेट गमावण्याचा सिलसिला सुरू झाला. १०६ वर ३ विकेट्सपासून १४६ धावांवर संपूर्ण बांगलादेश संघ सर्वबाद झाला.
भारताकडून उपकर्णधार विहान मल्होत्रा जो पार्ट टाईम गोलंदाज आहे, त्याने ४ षटकांत १४ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर खिलान पटेलने २ विकेट्स तर दिपेश देवेंद्रन, हेनिल पटेल व कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. भारताकडून आयुष म्हात्रे लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर झटपट २ विकेट्स गमावले. यानंतर वैभव सूर्यवंशी व अभिज्ञान कुंडू यांनी संघाच्या डावाची जबाबदारी घेतली. यासह दोघांनी ९९ चेंडूत ६२ धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशीने ६७ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ७२ धावांची खेळी केली. तर अभिज्ञान कुंडूने ११२ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या. तर कनिष्क चौहानने २८ धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. तर दीपेश देवेंद्रन ११ धावा केल्या.
