IND vs ENG 1st ODI Match Highlights: भारताने अखेरीस इंग्लंड दौऱ्यावरील पहिल्या विजयाची नोंद केली आहे. पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने ६ विकेट्सने विजय मिळवला. अक्षर पटेलच्या अष्टपैलू खेळीने भारताचा हा विजय अधिक सोपा केला. याशिवाय रोहित शर्मा विराट कोहली ही जोडगोळी लवकर माघारी परतल्यानंतर शुबमन गिल व श्रेयस अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. तर अखेरच्या षटकांमध्ये वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल यांनी टीम इंडियाला ५ षटकं शिल्लक ठेवत विजय मिळवून दिला.
इंग्लंडने दिलेल्या २५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिलने सावध सुरूवात केली. पण रोहित शर्मा ११ धावांवर बाद झाला आणि पुढच्या षटकात विराट कोहली ५ धावा करत माघारी परतला, या दोन मोठ्या विकेट्समुळे टीम इंडियाला चांगलाच फटका बसला. पण यानंतर श्रेयस अय्यर व कर्णधार शुबमन गिल यांनी १०१ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पण शुबमन गिल दुखापतीमुळे रिटारर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला.
शुबमन गिल ८० धावांवर माघारी परतल्यानंतर श्रेयस अय़्यर ३५ धावांवर धावबाद झाला. यानंतर केएल राहुल १ धाव करत क्लीन बोल्ड झाल्याने टीम इंडिया अडचणीत सापडली. पण वॉशिंग्टन सुंदर व अक्षर पटेल यांनी संघाचा डाव सावरत संघाला विजय मिळवून दिला. अक्षर पटेलने यादरम्यान ३९ धावांत उत्कृष्ट अर्धशतक झळकावलं. अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर दोघांनीही अर्धशतकं झळकावली. अक्षर पटेलने ५ चौकार व एका षटकारासह नाबाद ५७ धावांची खेळी केली. तर वॉशिंग्टनने ४ चौकार व एका षटकारासह ५२ धावा केल्या. वॉशिंग्टनने षटकार लगावत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं आणि टीम इंडियाने ४५.२ षटकांत २६२ धावा करत विजय नोंदवला.
इंग्लंडने सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या गोलंदाजांनी कमालीची सुरूवात करत इंग्लंडच्या फलंदाजांना धावा करण्यासाठी कष्ट करायला भाग पाडलं. पण बेन डकेटने पॉवरप्लेच्या अखेरच्या षटकांत काही मोठे फटके खेळले. बेन डकेट व जेकब बेथलने ६१ धावांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी रचली. बेथल १४ धावा तर बेन डकेट ४३ धावांवर बाद झाला. हॅरी ब्रुक, जोस बटलर व सॅम करन स्वस्तात बाद झाले. यासह १७ षटकांत इंग्लंडने ८० धावांत ५ विकेट्स गमावल्या. यानंतर लियाम डॉसन व जो रूट यांनी सातव्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली आणि इंग्लंडचा डाव सावरला.
लियाम डॉसन ८३ चेंडूत ६ चौकार व एका षटकारासह ६८ धावांची खेळी केली. तर संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज जो रूटने ६ चौकार व एका षटकारासह नाबाद ७६ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर विल जॅक्सने २० धावा तर आर्चरने १२ धावांचं योगदान दिलं. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. ४८व्या षटकात दोन विकेट्स घेत अक्षरने इंग्लंडला २५८ धावांवर सर्वबाद केलं. गुरनूर ब्रार व प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह व शिवम दुबे प्रत्येकी १-१ विकेट घेतली.
