India vs Namibia T20 WC Match Highlights: भारताने नामिबिया संघावर टी-२० वर्ल्डकप सामन्यात तब्बल ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. यासह भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय नोंदवला आहे. या सामन्यात टीम इंडियाने दोन्ही डावांमध्ये चांगली कामगिरी करत सामना सहज आपल्या नावे केला. हार्दिक पंड्याने या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत चमकदार कामगिरी केली. तर फलंदाजीत इशान किशन व संजू सॅमसनने संघाला चांगली सुरूवात करून दिली. तर भारताच्या गोलंदाजांनी टीम इंडियाला पुन्हा एकदा सामना जिंकून दिला आहे.
नामिबिया संघाला पराभूत करत भारताने टी-२० विश्वचषक २०२६ मधील सलग दुसरा सामना जिंकत सुपर-८ साठी आपला मार्ग अधिक सुकर केला आहे. दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. तर नामिबियाने सलग दुसरा सामना गमावला आहे.
भारताने दिलेल्या २१० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाने सावध फलंदाजी करत सुरूवात केली. सलामीवीर स्टीनकॅम्प व फ्रायलिंक यांनी ३३ धावांची भागीदारी रचली. यानंतर फ्रायलिंकला अर्शदीपने बाद केल्यानंतर स्टीनकॅम्प व लॉफ्टीइटन यांनी ३४ धावांची भागीदीरी रचली. पण वरूणने येताच पहिल्या चेंडूवर स्टीनकॅम्पला क्लीन बोल्ड केल्यानंतर नामिबियाने झटपट विकेट्स गमावले. स्टीनकॅम्प २९ धावा तर फ्रायलिंक २२ धावा करत बाद झाले. तर लॉफ्टीईटनने १३ धावा केल्या. तर कर्णधार गेराहार्ड इरॅस्मसला १८ धावांवर माघारी परतावं लागलं, ज्याने २ षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली होती.
पहिल्या ४ फलंदाजांनी चांगली सुरूवात केली, पण भारताच्या गोलंदाजीसमोर ते मोठी खेळी करू शकले नाहीत. भारताकडून या सामन्यात मिस्ट्री स्पिनर वरूण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स, तर हार्दिक पंड्या व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंग, शिवम दुबे व बुमराह यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
भारताने पहिल्या डावात केली शानदार फलंदाजी
नामिबियाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारताने दणक्यात सुरूवात केली. संजू सॅमसनने ८ चेंडूत २२ धावांची खेळी करत मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. यानंतर इशान किशन व तिलक वर्माने पॉवरप्लेमध्ये ८६ धावा करत सर्वात मोठा पॉवरप्ले स्कोअर उभारला. यासह ७ षटकांत भारताने १०० धावांचा आकडा पार केला, जे सगळ्यात फास्टेट टीम हंड्रेड आहेत.
इशान किशनने तर वादळी खेळी केली. इशान किशन २४ चेंडूत ६ चौकार व ५ षटकारांसह ६१ धावा करत बाद झाला. तर तिलक वर्माने २५ धावांचं व कर्णधार सूर्यकुमार यादवने १२ धावांचं योगदान दिलं. हार्दिक पंड्याने २८ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. तर शिवम दुबेने २३ धावांचं योगदान दिलं. यासह भारताने ९ बाद २०९ धावांची खेळी केली.
नामिबियाच्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजांना फार मोठी धावसंख्या उभारू दिली नाही. पॉवरप्लेनंतर नामिबियाने झटपट भारताच्या फलंदाजांना माघारी धाडलं. नामिबियाकडून कर्णधार गेराहर्ड इरास्मसने उत्कृष्ट गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत २० धावा देत ४ विकेट्स घेतल्या. बेन शिकोन्गो, स्मिट, बेर्नार्ड यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
