IND vs NZ 5th t20i: भारतीय संघाने पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात ४६ धावांनी दणदणीत विजय मिळवला. टी-२० विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि संघाने धावांचा डोंगर उभारत आपली तयारी अगदी पक्की असल्याचं सिद्ध केलं. भारताकडून इशान किशनने शतकी खेळी केली आणि गोलंदाजीत अर्शदीप सिंगने ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
तिरूवनंतमपुरमच्या ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळवला गेला. भारतीय संघाने या मालिकेतील सुरूवातीचे तिन्ही सामने एकतर्फी जिंकत मालिका आपल्या नावे केली होती. चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने बाजी मारली. पण अखेरच्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवत मालिका ४-१ ने जिंकली.
भारताने दिलेल्या २७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात टीम सेफर्ट झेलबाद झाला. यानंतर फिन एलनने आपल्या उत्कृष्ट फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधलं. एलनने ३८ चेंडूत ८ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. तर रचिन रवींद्रने १७ चेंडूत २ चौकार, २ षटकारांसह ३० धावा केल्या.
अक्षर पटेलने फिन एलनला झेलबाद करत संघाला महत्त्वाचा ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर न्यूझीलंडने विकेट्स गमावायला सुरूवात केली. ग्लेन फिलिप्सला ७ धावांवर अक्षरने माघारी धाडलं. यानंतर अर्शदीप सिंगने दोन वेळेस एका षटकांत २-२ विकेट्स घेतल्या आणि न्यूझीलंडचा डाव झटपट गुंडाळला. डॅरिल मिचेलने २६ धावांची खेळी केली. तर ईश सोधीने त्याच्या बॅटने महत्त्वपूर्ण धावा केल्या. ईश सोधीने १५ चेंडूत ३ षटकार व एक चौकार लगावत ३३ धावा केल्या. भारताकडून या सामन्यात अर्शदीपने ५ विकेट्स घेतल्या. तर अक्षर पटेलने ३ विकेट्स घेतल्या, तर रिंकू सिंग व वरूण चक्रवर्ती यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने दोन षटकांत चांगली सुरूवात केली. पण संजू सॅमसन ६ धावा करत झेलबाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा १६ चेंडूत ३० धावा करत माघारी परतला. यानंतर इशान किशन व सूर्यकुमार यादव यांनी ५६ चेंडूत १३७ धावांची भागीदारी केली, यासह संघाने २७१ धावांचा पाया रचला. इशानने ४३ चेंडूत ६ चौकार व १० षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ४ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने ६३ धावा केल्या.
सूर्या इशाननंतर हार्दिक पंड्याने १७ चेंडूत १ चौकार व ४ षटकारांसह ४२ धावांची खेळी केली. तर रिंकू सिंग व शिवमने महत्त्वाचे चौकार-षटकार लगावत संघाला २७१ धावांपर्यंत नेलं. न्यूझीलंडकडून लॉकी फर्ग्यूसनने २ विकेट्स, तर डफी, जेमिसन, सँटरन यांनी १-१ विकेट्स घेतल्या.
टी-२० विश्वचषक २०२६ पूर्वी टीम इंडियाची ही अखेरची टी-२० मालिका होती. या मालिकेत संघाने सर्व प्रकारची तयारी केली असून संघ विश्वचषकासाठी तयार असल्याचं म्हणता येईल. भारताचा टी-२० विश्वचषकातील पहिला सामना ७ फेब्रुवारीला अमेरिकेविरूद्ध मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

