IND vs SA 1st ODI highlights in Marathi: रांचीमध्ये झालेल्या पहिल्या हायस्कोरिंग वनडे सामन्यात भारताविरूद्ध कडवी झुंज दिली, पण विजय मात्र भारतीय संघाने आपल्या नावे केला. द. आफ्रिकेला अखेरच्या षटकात १८ धावांची गरज होती. अर्धशतक झळकावलेला कार्बिन बॉश फलंदाजी करत होता, तर प्रसिध अखेरच्या षटकात गोलंदाजीला आला आणि दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माकरवी झेलबाद झाला. यासह द. आफ्रिका ३३२ धावांवर सर्वबाद झाली व १७ धावांनी सामना जिंकला. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३५० धावांचं मोठं आव्हान दिलं होतं.
भारताने दिलेल्या ३५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेची सुरूवात फारच खराब झाली. संघाने फक्त ११ धावांत ३ विकेट्स गमावल्या होत्या. मारक्रम ७ धावा तर रिकल्टन व डिकॉक शून्यावर माघारी परतले. यानंतर टॉनी दि झॉर्झीने ३७ धावांची उत्कृष्ट खेळी केली. यानंतर मॅथ्यू ब्रिट्झके व मार्काे यान्सन यांनी ९७ धावांची भागीदारी रचत सामना द. आफ्रिकेच्या बाजूने वळवला.
कुलदीप यादवने ३ चेंडूत सामना भारताच्या बाजूने वळवला. यान्सन व ब्रिट्झके यांना कुलदीप यादवने ३४व्या षटकात माघारी धाडलं. पहिल्याच चेंडूवर यान्सन मोठा फटका खेळताना बाद झाला, तर तिसऱ्या चेंडूवर ब्रिटझकेने तीच चूक करत विकेट गमावली. ब्रिट्झकेने ८० चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ७२ धावांची खेळी केली. तर मार्काे यान्सनने ३९ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह ७० धावांची वादळी खेळी केली होती. यानंतर कार्बिन बॉशने अर्धशतकी खेळी करत संघाला विजयाच्या जवळ नेलं. बॉशने ४१ चेंडूत अर्धशतक झळकावलं. कार्बिन बॉश अर्धशतक करत मैदानात कायम होता. अखेरच्या षटकात १८ धावांची गरज असताना मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद होण्यापूर्वी त्याने ५१ चेंडूत ५ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांची खेळी केली.
भारताकडून हर्षित राणाने ३ विकेट्स तर कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या. तर अर्शदीप सिंगला दोन विकेट्स मिळाल्या. तर प्रसिध कृष्णाने अखेरच्या षटकात कार्बिन बॉशला बाद करत एक महत्त्वाची विकेट मिळवली.
तत्पूर्वी नाणेफेक द. आफ्रिकेने जिंकत भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. यासह भारताने ५० षटकांत ८ बाद ३४९ धावा केल्या. भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वाल १८ धावा करत बाद झाला. यानंतर रोहित शर्मा व विराट कोहली यांनी १३६ धावांची भागीदारी केली. रोहित शर्मा ५१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह ५७ धावा करत बाद झाला. तर विराटने कोहलीने विक्रमी शतक झळकावलं.
विराट कोहलीने या सामन्यात १२० चेंडूंत ११ चौकार व ७ षटकारांसह १३५ धावांची वादळी खेळी केली. त्याशिवाय कर्णधार केएल राहुलने ५६ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ६० धावा केल्या. तर रवींद्र जडेजाने २० चेंडूत २ चौकार व एका षटकारासह ३२ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून या सामन्यात बार्टमन, मार्काे यान्सन, नांद्रे बर्गर व कार्बिन बॉश यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.

