भारताच्या अंडर-१९ संघाने दक्षिण आफ्रिकेविरूद्धची वनडे मालिका २-०ने आपल्या नावे केली आहे. या मालिकेसाठी १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीवर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी होती. भारतीय संघाने दुसरा वनडे सामना ८ विकेट्सने जिंकला. मालिका विजयाबरोबरच वैभव सूर्यवंशीच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने इतिहास घडवला आहे.
दक्षिण आफ्रिका अंडर-१९ संघाविरूद्ध मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीला नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. बऱ्याच काळापासून फलंदाजीत चमकदार कामगिरी करणाऱ्या वैभवने आता कर्णधार म्हणूनही एक नवा टप्पा गाठला आहे. भारताच्या मालिका विजयात वैभव सूर्यवंशीने महत्त्वाची कामगिरी केली आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर अंडर-१९ संघाचे नेतृत्व करणारा वैभव सूर्यवंशी हा मालिका जिंकणारा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी पहिल्यांदाच संघाचं नेतृत्त्व करणाऱ्या वैभवच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ८ विकेट्सने (डीएलएसच्या आधारे) पराभव केला आणि अशा प्रकारे ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.
१९ वर्षांखालील संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार विहान मल्होत्राच्या दुखापतींमुळे, वैभव सूर्यवंशीची या मालिकेसाठी कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. योगायोगाने, मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये विजा चमकल्यामुळे व्यत्यय आला आणि त्यामुळे सामन्यातील षटकं देखील कमी झाली. भारताने मालिकेतील दोन्ही सामने डीएलएस पद्धतीसह जिंकले.
पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी ठरला होता, पण दुसऱ्या सामन्यात त्याने एकट्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध वादळी खेळी केली. टीम इंडियासमोर विजयासाठी २४६ धावांचे लक्ष्य होते, पण वैभव सूर्यवंशीने ५० षटकांच्या या सामन्यात टी-२० स्टाईलमध्ये फलंदाजी करत पहिल्या ८ षटकांत संघाला दमदार सुरुवात करून दिली. वैभव षटकारांचा पाऊस पाडत १९ चेंडूत अर्धशतक झळकावलं. वैभवने या सामन्यात २४ चेंडूत १० षटकार व एका चौकाराच्या मदतीने ६८ धावा केल्या.
वैभव बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या ९५ होती. त्यानंतर अभिज्ञान कुंडू (नाबाद ४८) आणि वेदांत त्रिवेदी (नाबाद ३१) यांनी संघाचा डाव सावरला. मात्र, विजांच्या कडकडाटामुळे सामना दोनदा थांबवण्यात आला. परिणामी, डकवर्थ-लुईस (डीएलएस) नियमानुसार भारतासमोर २७ षटकांत १७४ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. अभिज्ञान आणि वेदांत यांनी २४ व्या षटकात भारताला सामना जिंकून देत मालिका विजय मिळवला.
