India vs Afghanistan 1st ODI: अफगाणिस्तानचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये एकमेव कसोटी सामन्याचा थरार रंगला. ही मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आमनेसामने येणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना धरमशालेतील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जाणार होता. हा सामना ठरलेल्या वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरु होणार होता. पण पावसाने हजेरी लावल्यामुळे हा सामना अजूनही सुरु झालेला नाही. दरम्यान हा सामनात केव्हा सुरु होणार? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार,धरमशालेत अजूनही पावसाच्या सरी बरसत आहेत. या सामन्याची नाणेफेक १:३० वाजता होणार होती. तर २ वाजता सामना सुरु होणार होता. पण पावसामुळे अजून नाणेफेकही झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, अजूनही मुसळधार आणि संततधार पाऊस सुरु आहे. दोन्ही संघातील खेळाडू ड्रेसिंग रुममध्ये असून पाऊस थांबण्याची वाट पाहत आहेत. तसेच नियमानुसार, षटकं कमी करायला सुरुवात झाली आहे. २०-२० षटकांच्या सामन्यासाठी कट ऑफ टाईम वेळ संध्याकाळी ६:३० ची आहे.

रोहित खेळणार, विराट- हार्दिक बाहेर

आयपीएल झाल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी मैदानात उतरणार होते. दोघांनाही या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलं होतं. रोहित पूर्णपणे फिट असून मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. पण विराट कोहली पूर्णपणे फिट नाही, त्यामुळे त्याला या मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे. तर हार्दिक पंड्या देखील पूर्णपणे फिट नसल्याने, त्याला संघाबाहेर करण्यात आलं आहे.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ: रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, इशान किशन, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रसिध कृष्णा, प्रिन्स यादव.

अफगाणिस्तान संघ: रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झद्रान, सेदीकुल्लाह अटल, हशमतुल्लाह शहिदी (कर्णधार), रहमत शाह, इक्रम अलिखील (यष्टीरक्षक), अजमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, रशीद खान, नांगेयालिया खरोती, ए. एम. गझनफर, बिलाल सामी, दरविश रसुली, फरीद अहमद मलिक, झिया उर रहमान शरिफी.