Afghanistan Tour of India 2026: सध्या टी-२० विश्वचषक २०२६ अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. सेमीफायनलसाठीचे ४ संघ ठरले असून ४ आणि ५ मार्चला हे सामने खेळवले जातील. पहिला सेमीफायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात तर दुसरा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. टी-२० वर्ल्डकप नंतर आयपीएल खेळवली जाईल आणि त्यानंतर अफगाणिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचं वेळापत्रक बीसीसीआयने शेअर केलं आहे.
टी-२० विश्वचषकानंतर रोहित शर्मा व विराट कोहलीची जोडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. रो-कोची जोडी दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर विश्रांती घेत आहे. आता अफगाणिस्तानविरूद्ध मालिकेसाठी दोघेही संघात परतणार आहेत.
अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात एक कसोटी सामना खेळवला जाईल आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळेल. हा कसोटी सामना ६ जून ते १० जून २०२६ दरम्यान न्यू चंदीगड येथे खेळवला जाईल. एकदिवसीय मालिका १४ जून २०२६ रोजी धर्मशाला येथे सुरू होईल आणि त्यानंतरचे सामने लखनौ आणि चेन्नई येथे होणार आहेत.
सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होतील. पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी ही मालिका महत्त्वाची असेल. एकदिवसीय विश्वचषक २०२६ मध्ये होणार आहे आणि ही मालिका टीम इंडियाला विश्वचषकाची तयारी करण्यास मदत करेल. शुबमन गिल सध्या एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा देखील खेळताना दिसतील. कोहली आणि रोहित आता फक्त एकदिवसीय सामने खेळत आहेत, त्यामुळे ते मैदानावर क्वचितच दिसतात. पण एकदिवसीय विश्वचषकाची तयारी लवकरच सुरू होईल आणि आणखी एकदिवसीय सामने खेळले जातील. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू आता सातत्याने मैदानावर दिसणार आहेत.
भारत-अफगाणिस्तान मालिकेचे वेळापत्रक
एकमेव कसोटी: ६ जून ते १० जून, सकाळी ९.३० वाजता, चंदीगड
पहिला एकदिवसीय सामना: १४ जून २०२६, दुपारी १.३० वाजता, धर्मशाला
दुसरा एकदिवसीय सामना: १७ जून २०२६, दुपारी १.३० वाजता, लखनौ
तिसरा एकदिवसीय सामना: २० जून २०२६, दुपारी १.३० वाजता, चेन्नई
