India vs Afghanistan T20 series schedule announced in Delhi: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेचं वेळापत्रक बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. अफगाणिस्तानचा संघ या मालिकेचं यजमानपद भूषवणार आहे. दिल्लीमध्ये हे तिन्ही टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय संघ स्वत:च्या घरच्या मैदानावरच पाहुणा संघ ठरणार आहे. ही मालिका कधी, कुठे केव्हा खेळवली जाणार आहे, जाणून घेऊया.
जूनमध्ये भारताने अफगाणिस्तानचं यजमानपद भूषवत कसोटी आणि वनडे मालिका खेळवली होती, तर आता होणारी टी-२० मालिका या दोन संघांमधील यंदाचं द्विपक्षीय वेळापत्रक पूर्ण करेल. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी अफगाण क्रिकेटच्या विकासासाठी भारताची बांधिलकी पुन्हा अधोरेखित केली. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात नियमित द्विपक्षीय सामने सुरू ठेवण्यास बोर्ड उत्सुक असल्याचं त्यांनी सांगितलं.
अफगाणिस्तान भारत यांच्यातील टी-२० मालिकेचं वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता भारतीय संघाचा बांगलादेश दौरा होण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) १ ते १३ सप्टेंबर या कालावधीत सहा ‘व्हाइट-बॉल’ सामने आयोजित केले होते, परंतु अफगाणिस्तान मालिकेतील किमान एका सामन्याची तारीख या कालावधीशी ओव्हरलॅप होत आहे (म्हणजेच दोन्ही गोष्टी एकाच वेळी येत आहेत). बीसीबीने प्रस्तावित केलेल्या तारखांना आता तीन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधी उरला असल्याने, ही मालिका आता प्रत्यक्षात रद्द झाल्याचंच मानलं जात आहे; अगदी शेवटच्या क्षणी सरकारच्या काही सूचनांमुळे परिस्थितीत बदल होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
भारतातच भारताचा क्रिकेट संघ पाहुणा संघ ठरणार आहे. दोन्ही संघांमधील ही मालिका नवी दिल्लीमधील अरूण जेटली स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. पहिल्यांदाच भारतीय संघ आपल्या घरीच्या भूमीवर पाहुणा संघ म्हणून खेळणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या विकासासाठी बीसीसीआयने अनेक वर्षे संघाला मदत केली आहे, शिवाय संघाला सरावासाठी भारतात स्टेडियम उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळेच आता अफगाणिस्तानचा संघ भारतात या मालिकेचं यजमानपद भूषवणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान टी-२० मालिकेचं वेळापत्रक
१३ सप्टेंबर – भारत वि. अफगाणिस्तान – दिल्ली
१५ सप्टेंबर – भारत वि. अफगाणिस्तान – दिल्ली
१७ सप्टेंबर – भारत वि. अफगाणस्तान – दिल्ली
