Afghanistan to host India in historic T20 series at Delhi Arun Jaitley Stadium: भारत आणि अफगाणिस्तान संघांमध्ये येत्या १३ सप्टेंबरपासून टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. पण या मालिकेसाठी भारतीय संघ आपल्याच घरच्या मैदानावर पाहुणा संघ म्हणून खेळणार आहे. हो बरोबर ऐकलंत… भारतात होणाऱ्या या मालिकेचं यजमानपद अफगाणिस्तानकडे असणार आहे. पण अफगाणिस्तानचा संघ आपले सामने भारतात का खेळणार आहे, काय आहे यामागचं कारण, जाणून घेऊया.
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार आहे की, भारतात येऊन दुसरा देश टी-२० मालिकेचे आयोजन करणार आहे. त्यामुळे ही मालिका ऐतिहासिक ठरणार. या मालिकेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणार आहेत. जेवढी प्रतिकूल परिस्थिती तेवढ्याच त्वेषाने संघर्ष करत लढणं ही अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाची ओळख. रेफ्युजी कॅम्पमधून सुरूवात करत भारताला आपलं होमग्राऊंड बनवत अफगणिस्तान आता व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये आपलं प्रस्थ वाढवताना दिसत आहे.
टी-२० आणि एकदिवसीय विश्वचषकातील अफलातून कामगिरीमुळे अफगाणिस्तान संघाने अधिक नाव कमावलं. २०२३च्या विश्वचषकात अफगाणिस्तानने इंग्लंड, श्रीलंकासारख्या संघांना पराभूत करत अफलातून कामगिरीचा नमुना सादर केला. तर टी-२० वर्ल्डकप २०२४मध्ये त्यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना पराभूत करत पहिल्यांदाच उपांत्य फेरी गाठली होती. पण तुम्हाला एक माहितीये का अफगाणिस्तानचा संघ भारतात क्रिकेटचा सराव करतो. भारतातील दिल्ली हे अफगाणिस्तानचं दुसरं घर असं म्हणायला हरकत नाही.
भारत अफगाणिस्तानचं होमग्राऊंड कसं झालं?
अफगाणिस्तानात तालिबान राजवट असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव अफगाणिस्तानचे सामने त्यांच्या देशात होत नाहीत. सुरुवातीला अफगाणिस्तानने युएई तसंच श्रीलंकेतील दंबुला इथे सामने खेळले. त्यानंतर बीसीसीआयने त्यांना मदतीचा हात दिला. बीसीसीआयने अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाबरोबर एमओयू केला. ग्रेटर नोएडातील ग्रेटर नोएडास्थित शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स अफगाणिस्तानला देण्यात आलं. २०१७ मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका इथेच आयोजित केली.
नामिबियाविरुद्धचे काही सराव सामनेही इथे खेळवण्यात आले. या मैदानावर एक अवैध लीग खेळवण्यात आल्याने बीसीसीआयने या मैदानाला ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं. त्यामुळे अफगाणिस्तानला होम ग्राऊंड बदलावं लागलं. ते डेहराडून इथे राजीव गांधी स्टेडियमवर खेळू लागले. त्यानंतर लखनौ इथे अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवरही त्यांनी सामने खेळले. घरच्या मैदानावर सामने होणं आर्थिकदृष्ट्या फायद्याचं असतं. पण ते शक्य नाही. खेळपट्टी कशी तयार करायची याचा निर्णय यजमान बोर्डाला घेता येतो. अफगाणिस्तानला हा फायदाही मिळत नाही कारण त्यांचे सामने तटस्थ ठिकाणीच होतात. पण आता भारतातच या मालिकेचं यजमानपद भूषवण्याची अफगाणिस्तानला संधी मिळाल्याने पिच कसं तयार करायचं, माती कशी असणार, गवत किती असणार, या सर्वांची जबाबदारी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची असणार आहे.
अफगाणिस्तान संघाविरूद्धची टी-२० मालिका दिल्लीतच का?
राजधानी दिल्लीतल्या लाजपत नगर भागाला मिनी काबूल म्हटलं जातं. अफगाण नागरिकांच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला हे नाव मिळालं आहे. अफगाणी पद्धतीचं खाणंपिणं मुबलक प्रमाणावर इथे मिळतं. त्यांची संस्कृती अनुभवायला मिळते. दिल्लीत अफगाणिस्तानमधील मुलं शिकण्यासाठी दरवर्षी येत असतात. दिल्लीच्या अन्य काही भागातही अफगाणिस्तानचे नागरिक राहतात. त्यामुळे दिल्लीत सामना असणं अफगाणिस्तानच्या संघासाठी फायद्याचं आहे कारण त्यांना तिथे भरघोस पाठिंबा असतो. यामुळेच भारताविरूद्धची ही टी-२० मालिका दिल्लीत खेळवली जात आहे. आता या मालिकेत टीम इंडियाविरूद्ध अफगाणिस्तानचा संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांच्या नजरा आहेत.
