भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी अतिशय खास आहे. कारण गेल्या ८ महिन्यांपासून विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी क्रिकेटपासून दूर होती. ही जोडी आपला पहिला वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. चाहत्यांना या दोघांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण ही जोडी असं करू शकलेली नाही. विराट- रोहितची जोडी स्वस्तात माघारी परतली. त्यानंतर कर्णधार शुबमन गिलदेखील स्वस्तात माघारी परतला. यासह या तिन्ही फलंदाजांच्या नावे नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे.
हा सामना भारतीय वनडे संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मसाठी अतिशय खास होता, कारण हा त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. पण ५०० व्या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. पर्थच्या वेगवान उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर रोहित अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. जोश हेजलवूडने टाकलेल्या चेंडूवर रोहित दुसऱ्या स्लीपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला.
रोहित स्वस्तात माघारी परतल्यानंतर विराट कोहली मैदानात आला. विराट कोहलीसाठी देखील हा सामना अतिशय खास होता. कारण विराट देखील ८ महिन्यांनंतर पुनरागमन करत होता. पण विराटला खातं देखील उघडता आलं नाही. तो ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेलबाद होऊन माघारी परतला. विराट- रोहितकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण दोघेही स्वस्तात माघारी परतल्यानंतर चाहते निराश झाले.
रोहित- विराटची जोडी स्वस्तात माघारी परतली. दुसऱ्या बाजूला असलेल्या गिलकडूनही मोठ्या अपेक्षा होत्या. कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच दौरा आहे. सुरूवातीला काही चौकार मारून त्याने धावसंख्येत भर घातली. पण गिल लेग स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेलबाद होऊन माघारी परतला. गिलला अवघ्या १० धावा करता आल्या. या तिघांनी मिळून अवघ्या १८ धावा जोडल्या. ही या तिघांनी आतापर्यंत जोडलेली सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी या तिघांनी २०२३ मध्ये पाकिस्तानविरूद्ध खेळताना २५ धावा जोडल्या होत्या. त्यावेळी रोहितने ११, गिलने १० आणि कोहलीने ४ धावा केल्या होत्या. या सामन्यात या तिन्ही फलंदाजांच्या नावे या नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.
