Know India’s ODI record at Holkar Stadium Indore: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना २४ सप्टेंबर (रविवार) रोजी होणार आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्याचा प्रयत्न करेल. यावेळीही टीम इंडिया २४ सप्टेंबरला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे, हा योगायोगच म्हणावा लागेल.
२२ सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा ५ गडी राखून पराभव केला. इंदूरमध्येही कांगारूंचा मार्ग सोपा नसेल, कारण होळकर स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड मजबूत आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या एकदिवसीय विक्रमांबद्दल जाणून घेऊया.




इंदूरमध्ये टीम इंडिया अजिंक्य –
होळकर क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व आहे. टीम इंडियाच्या येथील दमदार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाचा मार्ग सोपा नसेल. भारताने इंदूरमध्ये आतापर्यंत ६ वनडे सामने खेळले आहेत. टीम इंडियाने हे सर्व सामने जिंकले आहेत. या मैदानावर भारतीय संघाने जगातील निवडक संघांना पराभूत केले आहे. या काळात भारताने इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा पराभव केला. टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागण्याची शक्यता दिसत आहे.
६ वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाचा झाला होता पराभव –
इंदूरमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सामना खेळण्याची ही दुसरी वेळ असेल. याआधी २०१७ मध्ये याच स्टेडियममध्ये दोन्ही संघांमध्ये सामना झाला होता. या सामन्यात भारतीय संघाने कांगारूंचा ५ विकेट्स राखून पराभव केला होता. तत्पूर्वी सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम खेळताना ६ गडी गमावत २९३ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून अॅरॉन फिंचने १२४ आणि स्टीव्ह स्मिथने ६३ धावा केल्या.
भारताकडून जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने २-२ विकेट घेतल्या. विजयासाठीचे २९४ धावांचे लक्ष्य भारताने ५ गडी गमावून पूर्ण केले. टीम इंडियासाठी हार्दिक पांड्याने सर्वाधिक ७८, रोहित शर्माने ७१ आणि अजिंक्य रहाणेने ७० धावा केल्या. सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पांड्याला सामनावीराचा किताब देण्यात आला होता.
सामन्याची तारीखही आहे खास –
६ वर्षांपूर्वी इंदूरमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवला, तो दिवस २४ सप्टेंबर २०१७ होता. यावेळीही टीम इंडिया २४ सप्टेंबरला इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना खेळणार आहे, हा योगायोगच म्हणावा लागेल. एकूणच आकडेवारी टीम इंडियाच्या बाजूने आहे. अशा स्थितीत भारताला हरवणे ऑस्ट्रेलियासाठी कठीण आहे.