India vs Australia 3rd ODI: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आज राजकोटमध्ये खेळला जात आहे. भारताने यापूर्वीचे दोन्ही सामने वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना जिंकले होते. आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने मागील दोन्ही सामन्यांतील फलंदाजीतील पोकळी भरून काढत टीम इंडियाच्या गोलंदाजांना अक्षरशः धू-धू धुतले. मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन या आघाडीच्या फलंदाजांनी शानदार अर्धशतके झळकावली. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३५३ धावांचे विशाल लक्ष्य ठेवले आहे. भारताने गेल्या दोन सामन्यात के.एल. राहुल कर्णधार होता. भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार पहिला वन डे पाच गडी राखून आणि दुसरा एकदिवसीय सामना ९९ धावांनी जिंकला. तिसरा एकदिवसीय सामना जिंकून भारतीय संघ ऑस्ट्रेलियालाविरुद्ध निर्भेळ यश संपादन करू इच्छितो. या सामन्यात नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि कुलदीप यादव पुनरागमन करत आहेत. भारतासमोर ३५३ धावांचे लक्ष्य आहे ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ३५३ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. कांगारूंनी ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. मिचेल मार्शने ८४ चेंडूंत १३ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ५६, स्टीव्ह स्मिथने ७४ आणि मार्नस लाबुशेनने ७२ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने १० षटकांत ८१ धावा दिल्या. कुलदीप यादवने दोन विकेट्स घेतल्या. तसेच, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. पहिल्या दोन वन डेत रोहित, कोहली आणि कुलदीप खेळले नव्हते. तिसऱ्या वन डेसाठी हे सर्व उपलब्ध आहेत. रोहितने यावेळी सामन्यात परतणे चांगले असल्याचे सांगितले. विश्वचषकापूर्वी संघातील प्रत्येक खेळाडू फ्रेश राहावा अशी आमची इच्छा आहे. अश्विनबाबत रोहित म्हणाला की, “अश्विनने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये दाखविलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत विश्वचषकासाठी राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान मिळू शकते. त्याला क्रिकेटचा खूप जास्त अनुभव आहे आणि तो दबावाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळतो. अश्विनचे दीर्घ कालावधीनंतर वन डेमध्ये पुनरागमन झाले आहे.” हेही वाचा: ICC ODI Ranking: बाबर आझमच्या आयसीसी रॅकिंगला शुबमन गिल ठरला धोका, जाणून घ्या कोण आहे कुठे? दोन्ही संघाची प्लेईंग-११ पुढीलप्रमाणे ऑस्ट्रेलिया: मिचेल मार्श, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, तन्वीर संघा, जोश हेझलवूड. भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.