scorecardresearch

IND vs AUS: कांगारूंनी रोखला टीम इंडियाचा विजयरथ! मायदेशातील पराभवावर दिग्गजांनी डागली तोफ, स्मिथचे केले कौतुक

भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत पराभव केल्याने क्रिकेट जगतात अनेक दिग्गजांकडून टीम इंडियावर टीका तर कांगारूंचे कौतुक होताना दिसत आहे.

Kangaroos stop Team India's wining series momentum defeat at home Cricket fraternity praises Australian captain Steve Smith
सौजन्य- बीसीसीआय (ट्विटर)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. २२ मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने २१ धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. त्याचबरोबर मागील सात वर्षात भारताला मायदेशात येऊन पराभूत करण्याचा कारनामा ऑस्ट्रेलियाने तीन वेळा करून दाखवला. ऑस्ट्रेलियन संघाच्या या विजयाचे श्रेय कर्णधार स्टीव्ह स्मिथ याला दिले जात आहे.

ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर चार सामन्यांची कसोटी मालिका व त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आला होता. नागपूर व दिल्ली येथे झालेल्या पहिल्या दोन कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाला नामुष्कीजनक पराभव स्वीकारावे लागले. त्यानंतर कौटुंबिक कारणाने ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स हा मायदेशी परतला. कमिन्सच्या जागी प्रदीर्घ कालावधीनंतर स्मिथ याच्याकडे संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. मध्यंतरी डेव्हिड वॉर्नर आणि स्मिथवर बॉल टॅम्परिंगवरून निलंबित करण्यात आले होते. त्याकाळात त्याचे कर्णधारपद गेले होते. पण नंतर त्याने आपल्या नेतृत्वाची कमाल दाखवत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या कसोटीत पुनरागमन करून देत विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. त्यानंतर मालिकेतील अखेरचा सामना अनिर्णीत राखण्यात ऑस्ट्रेलिया संघाला यश आले होते.

क्रिकेट जगतातील दिग्गजांकडून कौतुकाचा वर्षाव

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचे एकदिवसीय क्रिकेटमधील देशांतर्गत वर्चस्व गेल्या चार वर्षांपासून मोडीत काढले. तिसर्‍या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने पाच चेंडू शिल्लक असताना भारताचा २१ धावांनी पराभव केला आणि मालिका खिशात घातली. ऑस्ट्रेलियाचा हा भारताविरुद्धचा एकूण आठवा आणि भारतीय भूमीवरील सहावा एकदिवसीय मालिका विजय आहे. सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर गौतम गंभीर, मायकेल वॉर्न यांनी फलंदाजांना दोषी धरलं आहे.

चेन्नई येथे झालेल्या अखेरच्या सामन्यात देखील भारतीय संघ विजयाकडे आगेकूच करत होता. मात्र, मोक्याच्या वेळी त्याने अॅडम झॅम्पा व अॅश्टन अॅगर यांना गोलंदाजीला आणत भारताच्या फलंदाजांना अडचणीत टाकले. त्याच्या चलाखीमुळे ऑस्ट्रेलिया संघ भारताला विजयापासून रोखू शकला. स्मिथच्या नेतृत्वाचे कौतुक करण्याचा मोह भारताचा अवल फिरकीपटू रविचंद्र अश्विन याला देखील आवरला नाही. तसेच वसीम जाफर, बोरा मुजुमदार आणि जतीन सप्रू यांनी देखील ट्वीट करत ऑस्ट्रेलियन संघाचे कौतुक केले आहे.

खालच्या फळीतील फलंदाजांनी २७० पर्यंत पोहोचला – स्मिथ

ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ म्हणाला, “हा एक चांगला दौरा होता. दिल्ली कसोटीनंतर आम्ही जबरदस्त झुंज दिली. खालच्या फळीने शानदार फलंदाजी केली आणि आम्हाला २७० पर्यंत नेले, अन्यथा आम्ही एका टप्प्यावर २२० पर्यंत पोहोचू इच्छित नव्हतो. तो एक अद्भुत दौरा झाला आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम क्रिकेट खेळलो नाही पण विजय मिळवू शकलो. ही विकेट पूर्णपणे वेगळी होती. आमच्या फिरकीपटूंनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली.” क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये २६ मायदेशात मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाचा हा पहिला पराभव आहे. तिन्ही वनडेत १९४ धावा करणारा मिचेल मार्श मालिकावीर ठरला. त्याचवेळी, अॅडम झॅम्पाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 13:25 IST

संबंधित बातम्या