India vs Australia 1st ODI: आर. अश्विनने दीर्घ काळानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले, त्याने मोहाली येथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वन डेमध्ये १० षटकांच्या स्पेलमध्ये ४७ धावा दिल्या आणि मार्नस लाबुशेनच्या रूपात एक विकेटही घेतली. अश्विनचा विश्वचषक संघात समावेश होण्याची आशा अद्यापही मावळलेली नाही. बीसीसीआयने जरी विश्वचषकासाठी संघ जाहीर केला असला तरी २८ सप्टेंबरपर्यंत बदलही केले जाऊ शकतात. अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर अश्विनचा संघात समावेश होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. पहिला सामना संपल्यानंतर अश्विन रात्री उशिरापर्यंत मैदानावर सराव करताना दिसला.

अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात चांगली गोलंदाजी केली. जरी त्याला फक्त एक विकेट मिळाली असली तरी १० षटकांच्या स्पेलमध्ये त्याने जास्त धावा खर्च केल्या नाहीत. गोलंदाजीत आपली लय दाखविल्यानंतर तो फलंदाजीचा सराव करताना दिसला. सामना संपल्यानंतर एखादा खेळाडू नेटमध्ये किंवा मैदानावर सराव करत असल्याचे क्वचितच पाहायला मिळते, मात्र अश्विन शुक्रवारी रात्री असे करताना दिसला. अश्विनने नेटमध्ये बराच वेळ घालवला आणि फलंदाजीचा सराव केला. यावेळी फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड देखील उपस्थित होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत संधी मिळाल्याबद्दल आर. अश्विनने आनंद व्यक्त केला होता. बीसीसीआयने जाहीर केलेल्या व्हिडीओमध्ये तो म्हणाला, “माझ्यासाठी ही मोठी संधी आहे. गेल्या ३-४ वर्षांत मी खूप मेहनत घेतली आहे. माझी इच्छा आहे की, या संधींमधून मला खूप काही साध्य करायचे आहे. मला फक्त माझ्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे आणि संघासाठी सर्वोत्तम देण्याचा माझा प्रयत्न असेन. जेव्हा मी वेस्ट इंडिज सोडले तेव्हा मी ब्रेक घेतला, काही क्लब गेम्स खेळले. व्यवस्थापनाने मला जेव्हाही संधी मिळेल तेव्हा तयार राहण्यास सांगितले आहे होते आणि मी तयार आहे.”

अक्षर पटेलची दुखापत किती आहे गंभीर?

बांगलादेशविरुद्ध आशिया चषक सुपर-४ सामन्यात अष्टपैलू अक्षर पटेलला मनगट आणि मांडीला दुखापत झाली. त्याच्या विश्वचषकात खेळण्याबाबत साशंकता कायम आहे. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एन. सी. ए. उपचार घेत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत अंतिम १५ सदस्यीय संघ जाहीर करण्याची सूचना आयसीसीकडून देण्यात आली आहे. जर तोपर्यंत तो पूर्णपणे तंदुरस्त होऊ शकला नाही तर अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश केला जाऊ शकतो. त्यापार्श्वभूमीवर या दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडण्यात आले आहे.

हेही वाचा: IND vs AUS: “आप एसी में थे, मैं गर्मी में था”, पाच विकेट्स घेतल्यानंतर मोहम्मद शमी असं का म्हणाला? जाणून घ्या

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रविवार २४ सप्टेंबर रोजी होळकर स्टेडियम, इंदोर येथे खेळवला जाईल. के.एल. राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिकेत अभेद्य आघाडी मिळवायची आहे, तर पाहुण्या संघासाठी हा सामना ‘करो या मरो’ असा असणार आहे.

Story img Loader