भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून पहिला कसोटी सामना सुरु होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर या दोन अनुभवी खेळाडूंची अनुपस्थिती असणार आहे. त्यामुळे भारताला ऑस्ट्रेलियाच्या भूमीत त्यांच्याचविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी असल्याचे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले आहे. पण या दरम्यान भारताचा संयमी फलंदाज अजिंक्य रहाणे याने मात्र ऑस्ट्रेलियाचा या मालिकेसाठी ‘फेव्हरिट’ असल्याचे म्हटले आहे.

अजिंक्य रहाणे

भारत आणि ऑस्ट्रेलिया दोनही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांकडे प्रतिभावान खेळाडूंची फौज आहे. ऑस्ट्रेलियाकडे जरी दोन महत्वाचे आणि अनुभवी खेळाडू नसतील, तरी त्याची वेगवान गोलंदाजी हा त्यांचा हुकुमी एक्का आहे. त्यामुळे ही मालिका जिंकण्याचा दृष्टीने ऑस्ट्रेलियाचंच पारडं जड असल्याचं मत अजिंक्य रहाणे याने व्यक्त केले आहे. ‘जर तुम्ही त्यांचा गोलंदाजांचा ताफा पाहिलात तर तुम्हाला त्यातील मेख समजेल. कसोटी सामने जिंकायचे असतील तर त्यासाठी मूळ म्हणजे तुमच्याकडे चांगले गोलंदाज हवेत. तसे गोलंदाज ऑस्ट्रेलियाकडे आहेत, त्यामुळे त्यांचे पारडे जड असल्याचे अजिंक्यने सांगितले.

आम्हाला मालिका सहज जिंकता येईल असे मला वाटत नाही. कारण कोणताही संघ आपल्या देशात खेळताना त्या वातावरणाशी परिचित असतो. त्यामुळे मायभूमीवर त्या-त्या संघाचा केहल चांगला होतो आणि बहरतो. त्यासारख्या संघात महत्वाचे दोन खेळाडू आहेत. हे दोन खेळाडू जगातील सर्वोकृष्ट खेळाडूंपैकी आहेत. पण असे असले तरी आम्ही ऑस्ट्रेलियाच्या संघाला कमी समजण्याची चूक करणार नाही, असेही तो म्हणाला.