Jasprit Bumrah Record: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना गुरूवारी पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांच्या दमदार कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दमदार विजयाची नोंद केली. यासह टी-२० मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विकेट्सचं शतक पूर्ण करण्याची संधी होती. त्याला या सामन्यात १ गडी बाद करता आला. यादरम्यान त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.
अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच नंबर १ गोलंदाज
जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज बनला आहे.याआधी पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल या यादीत अव्वल स्थानी होता. सईद अजमलने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना ११ डावात सर्वाधिक १९ गडी बाद केले होते. आता जसप्रीत बुमराह या यादीत नंबर १ स्थानी पोहोचला आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना १६ डावात २० गडी बाद केले आहेत. तर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. आमीरने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना एकूण १७ गडी बाद केले होते.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज
जसप्रीत बुमराह (भारत), २० गडी (१६ डावात)
सईद अजमल (पाकिस्तान), १९ गडी ( ११ डावात)
मोहम्मद आमीर (पाकिस्तान), १७ गडी (१० डावात)
भारतीय संघाचा दमदार विजय
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या शुबमन गिलने ४६ धावांची खेळी केली. तर अभिषेक शर्माने २८ धावांची खेळी केली. शिवम दुबेने २२ धावा केल्या. तर शेवटी अक्षर पटेलने नाबाद २१ धावांची खेळी केली. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २० षटकांअखेर ८ गडी बाद १६७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव अवघ्या ११९ धावांवर आटोपला. हा सामना भारताने ४८ धावांनी जिंकून मालिकेत २-१ ने आघाडी घेतली.
