ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात झालेल्या वादानंतर टीकेचा धनी बनलेल्या विराट कोहलीच्या बचावासाठी बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख संदीप पाटील धावून आले आहेत. ‘मिड डे’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये पाटील यांनी विराट हा एखाद्या वाघासारखा आहे, त्याच्या आक्रमकतेवर बोट ठेवून त्याला पिंजऱ्यात कैद करु नका असं वक्तव्य केलं आहे.

अवश्य वाचा – IND vs AUS : विराट कोहली भारतीय संघाचा उर्जास्त्रोत !

“वाघाची नखं आणि दात पाडल्यानंतर तो धोकादायक राहत नाही. कोहलीच्या आक्रमकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन त्याला मवाळ होणं भाग पाडणं हे योग्य होणार नाही. वाघ हा नेहमी जंगलात मोकळेपणाने आक्रमकतेने फिरताना दिसायला हवा, त्याला पिंजऱ्यात कैद केलेलं चांगलं दिसणार नाही. प्रत्येक सामन्यात अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सामनाधिकारी असतात, आणि जोपर्यंत विराट आपली मर्यादा ओलांडत नाही तोपर्यंत कसलाच प्रश्न येत नाही. विराटने मर्यादा ओलांडल्यास त्याची किंमत त्याला मोजावी लागेल.” संदीप पाटील यांनी कोहलीचं समर्थन केलं.

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर मात करुन मालिकेची धडाक्यात सुरुवात केलेल्या भारताला दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. फलंदाजीत सलामीच्या जोडीचं अपयश, विराट आणि पुजाराचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाचं फॉर्मात नसणं या गोष्टी भारतासाठी धोकादायक ठरु शकतात. आतापर्यंत दोन कसोटी सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी आश्वासक मारा केला आहे. 26 डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.