ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेची मोठ्या धडाक्यात सुरुवात करणाऱ्या भारतीय संघाची फलंदाजी नंतरच्या सामन्यांमध्ये चांगलीच कोलमडली. ठराविक फलंदाजांचा अपवाद वगळता भारताचे फलंदाज घरच्या मैदानावर खेळत असताना ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करु शकले नाहीत. अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 273 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज पुन्हा एकदा कोलमडले. सलामीवीर रोहित शर्माने 56 धावांची खेळी केली. यादरम्यान रोहित शर्माने सचिन तेंडुलकर आणि हाशिम आमला यांच्या नावावर असलेला विक्रम आपल्या नावे जमा केला.

सलामीवीर म्हणून सर्वात जलद 6 हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित पहिल्या स्थानी पोहचला आहे. 121 डावांमध्ये रोहितने ही कामगिरी केली आहे. रोहितने यादरम्यान हाशिम आमलाचा 123 डावांचा आणि सचिन तेंडुलकरचा 133 डावांचा विक्रम मोडीत काढला. याचदरम्यान रोहित शर्माने वन-डे क्रिकेटमध्ये 8 हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.