अॅडलेड कसोटी जिंकण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियाला 323 धावांचं आव्हान दिलं आहे. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समर्थपणे सामना केला. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करुन भारताला आघाडी मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला. हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर असताना त्यांना बाद करणं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांठी जिकरीचं काम होऊन बसलं होतं.

अखेर फिरकीपटू नेथन लॉयनने पुजाराला बाद करत भारताची जमलेली जोडी फुटली. पुजाराने 71 धावांची खेळी केली. मात्र पुजाराला बाद करण्यात ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचाही तितकाच महत्वाचा वाटा होता. लॉयनच्या गोलंदाजीदरम्यान शेन वॉर्न फॉक्स क्रिकेट वाहिनीसाठी समालोचन करत होता. यावेळी लॉयनचा मारा पाहून, शेन वॉर्नने समालोचन करत असताना पुजाराविरुद्ध एका विशिष्ट टप्प्यात लॉयनने मारा केला तर त्याला विकेट मिळेलं असं वक्तव्य केलं, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजेच दुसऱ्याच चेंडूवर पुजारा लॉयनच्या गोलंदाजीवर बाद झाला.

शेन वॉर्नच्या या अंदाजाचं त्याचा सहकारी समालोचक मायकन वॉर्ननेही कौतुक केलं. दुसऱ्या डावात लॉयनने भारताच्या 6 फलंदाजांना माघारी धाडलं.