केएल राहुलच्या ७५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला. वानखेडे स्टेडियमवरील राहुलच्या या खेळीने त्याच्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. एकेकाळी व्यंकटेश प्रसाद यांनी टीकेची झोड उठवली होती, रोज ते टीका करत होते. कसोटी संघातून वगळलं आणि त्यानंतर उपकर्णधारपद ही गमावलं. मात्र काही आठवड्यांनंतर, राहुलने धाडसी आणि भारताला विजयी करून देणारी खेळी करत सर्वांनाच चोख प्रत्युतर दिले.
सुनील शेट्टी यांनी व्यंकटेश प्रसाद यांच्यावर केली जोरदार टीका
केएल राहुलच्या या खेळीनंतर त्याचे सासरे आणि बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टी यांनी दिग्गज क्रिकेटर व्यंकटेश प्रसाद यांच्यावर निशाणा साधला आहे. भारतीय कसोटी संघातील राहुलच्या स्थानावर प्रसादनेच सर्वप्रथम प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नागपुरात बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यादरम्यान त्याने अनेक ट्विट केले होते. त्यांनी निवड समिती, बीसीसीआय आणि समालोचकांनाही फटकारले होते. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये राहुलच्या मागील विक्रमाचाही उल्लेख केला होता. यानंतर प्रसाद रोज राहुलवर टीका करत होते. यावर ‘काहीना सवय असते’ असे म्हणत टोमणा मारला.
व्यंकटेश आणि आकाश चोप्रा यांच्यात भांडण झाले होते
राहुलच्या अशा टीकेनंतर माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा त्याच्या मदतीला धावून आला आणि व्यंकटेशसोबत बराच वेळ वाद घातला. बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी संघ जाहीर केला तेव्हा राहुलने उपकर्णधारपद गमावले आणि त्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. शुक्रवारी राहुलने वनडेमध्ये भारतीय संघात पुनरागमन करत संघाला विजयापर्यंत नेले.
सुनील शेट्टीचा व्हिडिओ व्हायरल
राहुलच्या या खेळीबद्दल सुनील शेट्टी यांना विचारले असता, त्यांनी व्यंकटेशवर अप्रत्यक्षपणे भाष्य करत खरपूस समाचार घेतला आणि सांगितले की, “जेव्हा वरचा देव पाठिशी असतो तेव्हा बाहेरचे कोणी काही बोलू देत फरक पडत नाही.” तसेच, विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२ चेंडूत केवळ ९ धावा करून राहुल मिचेल स्टार्कचा बाद झाला होता. भारताने हा सामना १० विकेटने गमावला.
भारताचा हा वन डे इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. त्याचवेळी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी भारताने वनडे इतिहासातील आपला सर्वात मोठा विजय देखील साजरा केला होता. १५ जानेवारी २०२३ रोजी तिरुअनंतपुरम येथे झालेल्या वन डे सामन्यात भारताने श्रीलंकेला तब्बल ३१७ धावांनी मात दिली होती. त्यामुळे भारतीय संघाला आजवरचा सर्वात मोठा विजय व सर्वात मोठा पराभव हे केवळ दोन महिन्याच्या अंतरानेच पाहावे लागले.
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.