scorecardresearch

Virat Surpassed Dravid: एकाच सामन्यात मोडले तीन विक्रम; प्रशिक्षक राहुल द्रविडलाही मागे टाकत विराट कोहलीने मारली बाजी

भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा आपल्या मूळ शैलीत दिसला.

Virat Surpassed Dravid: एकाच सामन्यात मोडले तीन विक्रम; प्रशिक्षक राहुल द्रविडलाही मागे टाकत विराट कोहलीने मारली बाजी
विराट कोहली (प्रातिनिधिक फोटो : पीटीआय)

भारताचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा आपल्या मूळ शैलीत दिसला. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरलेल्या विराटने हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात त्याने वेगवान धावा केल्या आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. विराटने आपल्या टी२० कारकिर्दीतील ३३वे अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

या सामन्यांमध्ये कोहलीने ४८ चेंडूत ६३ धावा केल्या आणि सूर्यकुमार यादवबरोबर तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही केली. या खेळीत त्याने तीन चौकार आणि चार षटकार मारले. या दरम्यान त्याने आपल्या मॅच-विनिंग इनिंगमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत. हे विक्रम होते आहेत ते जाणून घेऊया.

वनडे आणि टी२० मध्ये पूर्ण केल्या १६ हजार धावा

विराटच्या आता ४७१ सामन्यांच्या ५२५ डावांमध्ये ५३.६२ च्या सरासरीने २४,०७८ धावा आहेत. यादरम्यान त्याने ७१ शतके आणि १२५ अर्धशतके झळकावली. याशिवाय विराटने आणखी एक कामगिरी केली. त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये १६ हजार धावा पूर्ण केल्या आणि सचिननंतर असे करणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला.

टी२० आंतरराष्ट्रीय मध्ये ३६०० धावा पूर्ण केल्या

विराटने टी२० आंतरराष्ट्रीयमध्येही एक विक्रम केला आहे. त्याने टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये ३६०० धावा पूर्ण केल्या आणि यानंतर हा आकडा गाठणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आधी केवळ रोहित शर्मालाच ही कामगिरी करता आली होती. विराटच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने आतापर्यंत १०७ सामन्यांमध्ये ५०.८३ च्या सरासरीने आणि १३८ च्या स्ट्राइक रेटने ३६०० धावा केल्या आहेत आणि या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात तो दुसऱ्या स्थानावर आहे. विराट टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडूदेखील आहे. त्याने एक शतक आणि ३३ अर्धशतकांसह एकूण ३४ वेळा ही कामगिरी केली आहे.

राहुल द्रविडलाही टाकलं मागे

विराट कोहलीने संघाचे प्रशिक्षक आणि दिग्गज फलंदाज राहुल द्रविडचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत विराट आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण ४७१ सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने २४,०७८ धावा केल्या आहेत. द्रविडने त्याच्या कारकिर्दीत २४,२०८ धावा केल्या. यात त्याने एशिया इलेव्हन आणि वर्ल्ड इलेव्हनकडून खेळताना १४४ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या