IND vs AUS 4th ODI : भारताविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून विजय मिळवला. पीटर हॅंड्सकॉम्बचे शतक (११७), ख्वाजाची संयमी खेळी (९१) आणि टर्नरची तुफानी ८४ धावांची खेळी याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३५९ धावांचे आव्हान २ षटके राखून पार केले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने ५ सामन्यांच्या मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. शिखर धवनच्या १४३ धावा आणि रोहित शर्माच्या ९३ धावांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करत ५० षटकात ९ बाद ३५८ धावा केल्या होत्या. मात्र भारताला ३५९ धावांच्या मोठ्या आव्हानाचा बचाव करता आला नाही. त्यानंतर अनेकांनी धोनीची संघातील उणीव बोलून दाखवली. यातच सूर मिसळून भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांनी विराटचे नेतृत्वकौशल्य आणि कर्णधारपद हे धोनीशिवाय अपूर्ण असल्याची सडेतोड टीका केली आहे.

मी खरं तर या विषयावर बोलणं योग्य नाही. पण धोनीला विश्रांती देण्याची गरज काय हे मला समजलं नाही. रविवारच्या सामन्यात त्याची अनुपस्थिती पूर्णपणे जाणवली. यष्टीरक्षक, फलंदाज आणि मैदानावर त्याची उणीव भासली. धोनी हा संघाचा जवळपास निम्मा भार सांभाळतो, त्यामुळे त्याला संघाचा निम्मा कर्णधार म्हटले तर आश्चर्य वाटण्याचे मुळीच कारण नाही, असे ते म्हणाले.

धोनीचं वय कमी होणार नाही हे सत्य आहे. तो मैदानावर देखील तितका चपळ राहिलेला नाही हे पण खरं आहे. पण संघाला त्याची आवश्यकता आहे. तो फक्त मैदानावर असणं संघासाठी पुरेसं असतं. त्याच्या शांततेत देखील खूप काही दडलेलं असतं. विराटला मैदानावर धोनीची गरज भासते, ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते. हे चांगल्या कर्णधाराचे लक्षण नाही, अशी टीकादेखील बेदी यांनी केली आहे.

संघातील सातत्याने बदल करण्याच्या पद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ‘मला असं वाटतं की वर्तमानकाळात जगणं हे संघासाठी फायद्याचे ठरेल. विश्वचषक स्पर्धा अजूनही जवळपास दोन महिने दूर आहे आणि गेले एक वर्षभर भारतीय संघ व्यवस्थापन असे प्रयोग करत आहे. पण हे मला अजिबात पटलेलं नाही, असेही ते म्हणाले.