Virat Kohli Lost New Phone: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याआधीच विराट कोहलीवर भलत्याच दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्वतः कोहलीने याबाबत सोशल मीडियावर माहिती देत ट्वीट केले आहे. विराट कोहलीने घेतलेला नवा कोरा फोन बॉक्स उघडण्याच्या आधीच हरवल्याचे सांगत त्याने पोस्ट केली आहे. यावर अनेक क्रिकेटपटू व विराटच्या चाहत्यांनी ट्वीट करून त्याचं सांत्वन केलं आहे. कोहलीच्या या अचानक व अनपेक्षित ट्वीटवर काहींना अनेक संशय सुद्धा येत आहेत. नेमकं हे प्रकरण काय चला पाहुयात.
विराट कोहलीने आज, मंगळवारी, ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजून ३४ मिनिटांनी ट्विटरवर पोस्ट लिहिली आहे. यात कोहली म्हणतो, ” तुमचा नवा कोरा फोन बॉक्स उघडण्याच्या आधीच बॉक्ससहित गायब होण्याइतकं दुःख कशातच नाही, कोणी माझा फोन पाहिला आहे का?” यावर अनेकांना ट्वीट करून जाऊदे भावा नवीन फोन घे असे सल्ले दिले आहेत.
कोहलीचा फोन हरवला
विराटच्या चाहत्यांना हे ट्वीट म्हणजे एक प्रॅन्क असल्याचे वाटत आहे. कोहलीने जाहिरातीसाठी असं ट्वीट केलं असावं असेही लिहिले आहे. आता थोड्यावेळाने मागोमाग जाहिरातीचा व्हिडीओ येईल अशा कमेंट्स कोहलीच्या ट्वीट खाली पाहायला मिळत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी विराट कोहलीने रोहित शर्माच्या विसरभोळेपणावरून कमेंट केली होती, हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. काहींनी कमेंटमध्ये त्याच व्हिडिओचा संदर्भ देत आता तू पण गोष्टी विसरायला लागलास का असे म्हंटले आहे.