सध्याच्या घडीला भारतीय संघात ऋषभ पंत इतका दुर्दैवी खेळाडू शोधूनही सापडणार नाही असं मला वाटलं. धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिलं गेलं.कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षांचं ओझ घेऊन मैदानात उतरलेल्या पंतला या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत आणि काही कालावधीतच तो संघाबाहेर फेकला गेला. सध्याच्या घडीलाही त्याचं संघातलं स्थान निश्चीत नाहीये. वन-डे, टी-२० मध्ये लोकेश राहुल यष्टीरक्षणाची भूमिका साकारतोय. पर्याय म्हणून आता पंतऐवजी सॅमसनचा विचार केला जातोय. कसोटीतही टीम मॅनेजमेंट साहाचा पर्याय खुला ठेवूनच पंतला संघात स्थान देतंय. ऋषभ यष्टीरक्षणात धोनीच्या तोडीची कामगिरी करत नसला तरीही तो एक प्रतिभावान आक्रमक फलंदाज आहे यात कोणाच्या मनात शंका नसावी, अगदी त्याच्या विरोधकांच्याही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात आणि इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रमक पंतने करुन दाखवला आहे. पंतला आपल्या खेळात सुधारणा करण्याची गरज आहे, त्याचं यष्टीरक्षण तितकंस चांगलं नाही अशा एक ना अनेक चर्चा आपण पंतबद्दल ऐकल्या असतील. परंतू पंतचं संघात स्थान अनिश्चीत होण्यासाठी जितका तो स्वतः जबाबदार आहे तितकंत टीम मॅनेजमेंटही जबाबदार आहे. टीम इंडियात असुरक्षिततेची भावना - रवी शास्त्री आणि त्यांच्यासोबत काम करत असणाऱ्या सर्व प्रशिक्षक सहकाऱ्यांना अद्याप टीम इंडियाची घडी बसवता आलेली नाही यासारठी दुर्दैवी गोष्ट नाही. काही दिवसांपूर्वी माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने टीम इंडियाच्या मॅनेजमेंटवर टीका करताना, संघात खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना असल्याचं म्हटलं होतं. कामगिरी करुन दाखवली नाही तर एक-दोन सामन्यांनंतर आपलं संघातलं स्थान जाईल अशी भावना प्रत्येकाच्या मनात आहे. खराब कामगिरी झाली तरीही आम्ही तुझ्या पाठीशी आहोत ही भावना खेळाडूंमध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. गांभीर्याने विचार करायला गेलं तर गंभीरचं म्हणणं अयोग्य नाहीये हे आपल्याला कळेल. कसोटी क्रिकेटमध्ये यष्टीरक्षकांमध्ये इतक बदल आताच्या घडीला कोणताही संघ करत नसेल. भारताबाहेर ऋषभ पंतची फलंदाजीची आकडेवारी आश्वासक असूनही पहिल्या कसोटीसाठी त्याचा विचार केला गेला नाही ही खरंच आश्चर्याची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सलग ८ डावांत २५ पेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पंतला स्थान मिळालं आहे. जाणून घेऊया त्याच्या फलंदाजीबद्दलची आकडेवारी - Rishabh Pant in Australia (Test)25, 28, 36, 30, 39, 33, 159*29 (Today)#INDvsAUS— CricBeat (@Cric_beat) December 27, 2020 Asian players with Most Test runs in Australia at age of 23379 - Rishabh pant368 - Sachin Tendulkar331 - Javed Miandad#AUSvIND— (@Shebas_10dulkar) December 27, 2020 ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटी सामन्यातही भारतीय धावगतीला वेग मिळवून देण्याचं काम ऋषभ पंतने केलं. दिवसभरातल्या पहिल्या २६ षटकांत पुजारा-रहाणे-विहारी यांनी मिळून अवघ्या ५४ धावा केल्या. परंतू पंत मैदानात आल्यानंतर पुढच्या काही षटकांमध्ये भारताने ९९ धावा केल्या. ऋषभ पंत फटकेबाजी करत असताना पाहून रहाणेनेही आपल्या खेळाचा वेग वाढवत धावा जमवण्यास सुरुवात केली. पंत नव्या दमाचा खेळाडू - गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटची व्याख्या बदलली आहे. पूर्वीप्रमाणे फलंदाज आता सावध पवित्रा न घेता कसोटीतही सुरुवातीच्या षटकांपासून चांगली फटकेबाजी करतात. अनेकदा भारताला कसोटी सामन्यात संथ खेळाचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत भारताला पंतसारख्या फटकेबाजी करणाऱ्या खेळाडूंची संघात गरज आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंत हा तरुण आहे, त्यामुळे त्याला योग्य आत्मविश्वास दिल्यास तो मधल्या फळीत भारतासाठी आगामी काळात उपयुक्त खेळाडू ठरु शकतो. खेळाडू दोषी मग प्रशिक्षकांचं काय?? ऋषभ पंतचं ज्याप्रमाणे फलंदाजीचं तंत्र सदोष आहे त्याचप्रमाणे त्याचं यष्टीरक्षणाचं तंत्रही सदोष आहे. मेलबर्न कसोटी सामन्यातही पंतने आश्निन, जाडेजाच्या गोलंदाजीवर चेंडू सोडले. फिरकीपटूंना यष्टीरक्षण करताना पंत आजही चाचपडतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू कुठे वळतोय याचा अंदाज अजुनही पंतला योग्य पद्धतीने येत नाही. एवढं सगळं समोर घडत असतानाही टीम इंडियाचा प्रशिक्षक वर्ग पंतचं यष्टीरक्षण सुधारण्याकडे का लक्ष देत नाही हेच कळत नाही. २०१९ विश्वचषकानंतर सुमारे वर्षभर ऋषभ पंत भारतीय संघाचा हिस्सा आहे. आपल्या संघातील एका खेळाडूंचं तंत्र बिघडलं आहे, त्याला फलंदाजी-यष्टीरक्षण करताना अनेस समस्यांना सामोरं जावं लागतंय ही बाब अजुनही प्रशिक्षकांच्या लक्षात का आली नाही आणि आली नसेल तर त्याच्या तंत्रात सुधारणा करण्यासाठी प्रशिक्षकांनी काही प्रयत्न का केले नाही?? कामगिरी खराब झाली म्हणून खेळाडूला संघाबाहेर करणं हा न्याय असेल तर प्रशिक्षकांच्या कामगिरीचं मुल्यमापन करताना कोणते निकष लावायचे?? ऋषभ पंत सर्वोत्तम फलंदाज आहे असं कोणाचंही म्हणणं नाही. परंतू त्याच्यात सर्वोत्तम फलंदाज बनण्याची शक्ती आणि गूण आहेत याबद्दलही कोणाचं दुमत नसावं. दोन काय चार कसोटी सामन्यांत फेल गेलास तरी हरकत नाही, तुझं तंत्र सुधारण्याकडे लक्ष दे आम्ही तुझ्या पाठीशी आहोत हा मेसेज पंतपर्यंत जाणं गरजेचं आहे. भारतीय संघात आणि मॅनेजमेंटमध्ये हे बदल घडले नाहीत तर मग आहे तसं चित्र कायम राहील..बाकी उरतं काय?? सब चंगा सी.