India vs Australia 2nd Test: भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना येत्या६ डिसेंबरपासून अॅडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. अॅडलेड कसोटी हा गुलाबी चेंडूचा सामना म्हणजे रात्र दिवस कसोटी सामना असणार आहे. पण पहिल्या कसोटीतील पराभवानंतर ऑस्ट्रेलियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. पण या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी दोन गोलंदाजांना संघात सामील केले आहे. हे दोन गोलंदाज नेमके कोण आहेत जाणून घेऊया.
जोश हेझलवूडने पहिल्या कसोटीत पहिल्याच डावात ५ विकेट्स घेत संघासाठी मोठी भूमिका बजावली होती. पण दुसऱ्या कसोटीत त्याची अनुपस्थिती संघासाठी मोठा सेटबॅक असणार आहे. आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन कसोटी संघात सीन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेटला संधी मिळाली आहे. ॲबॉट याआधी ऑस्ट्रेलियाकडून एकदिवसीय आणि टी-२० सामना खेळला आहे, परंतु डॉगेटने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.
हेही वाचा – IND vs PAK: आज होणारा भारत-पाकिस्तान मुकाबला कुठे लाईव्ह पाहता येणार? जाणून घ्या वेळ आणि चॅनेल
कोण आहे ब्रेंडन डॉगेट? (Who is Brendon Doggett?)
ब्रेंडन डॉगेट याला दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात सामील केले आहे. याआधी २०१८ मध्ये तो पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी यूएईला गेला होता. ३० वर्षीय डॉगेटने आतापर्यंत ४० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये एकूण १४२ विकेट घेतल्या आहेत. या यादीत त्याच्या नावावर २३ विकेट्स आहेत. डॉगेटने या मोसमात तीन शिल्ड सामन्यांमध्ये ११ विकेट घेतले आहेत. डॉगेटला अद्याप ऑस्ट्रेलियासाठी पदार्पणाची संधी मिळाली नाही.
कोण आहे सीन ॲबॉट? (Who is Sean Abbott?)
३२ वर्षीय सीन ॲबॉटने ऑस्ट्रेलियाकडून वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. त्याने आतापर्यंत २६ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण २९ विकेट घेतल्या आहेत. तर २० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण २६ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याचा रेकॉर्ड चांगला आहे, जिथे त्याच्या नावावर २६१ प्रथम श्रेणी विकेट आहेत. त्याला अद्याप कसोटी पदार्पणाची संधी मिळाली नसली तरी एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये छाप पाडण्यात तो यशस्वी ठरला आहे. तो आयपीएलमध्ये आरसीबी आणि सनरायझर्स हैदराबादकडूनही खेळला आहे.
२०१४ मध्ये, ऑस्ट्रेलियाचा हरहुन्नरी क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेसचा शेफिल्ड शिल्ड स्पर्धेतील सामन्यादरम्यान चेंडू लागून मृत्यू झाला होता. तेव्हा सीन ॲबॉट गोलंदाजी करत होता. सीनचा बाऊन्स ह्यूजेसच्या मानेच्या खालच्या भागावर लागला, त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
IND vs AUS: दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर, शॉन ॲबॉट आणि ब्रेंडन डॉगेट