Ajinkya Rahane's innings praised by wife Radhika: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या तिसऱ्या दिवशी टॉप ऑर्डरच्या अपयशानंतरही टीम इंडियाला २९६ धावांपर्यंत मजल मारता आली. भारतीय संघाला २९६ धावांपर्यंत पोहोचवण्यात अजिंक्य रहाणेने महत्त्वाची भूमिका बजावली. रहाणेने शार्दुल ठाकूरसोबत सातव्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी करत फॉलोऑन खेळण्यापासून वाचवले. यादरम्यान पॅट कमिन्सचा एक चेंडू त्याच्या अंगठ्यालाही लागला, पण त्याने हार मानली नाही. टीम इंडियाच्या सहकारी खेळाडूंनीच नव्हे, तर पत्नी राधिका धोपवकरनेही त्याच्या या भावनेचे कौतुक केले. अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल त्याची पत्नी राधिका धोपवकरने सोशल मीडियावर त्याचे काही फोटो पोस्ट केले. तसेच कठीण परिस्थितीत खेळलेल्या त्याच्या खेळीचे कौतुक केले. दुखापतीच्या अंगठ्यासह रहाणेचा फोटो पोस्ट करत तिने लिहिले की, "तुझे बोट सुजले असूनही, तू तुझी मानसिकता कमी होऊ दिली नाही आणि स्कॅन करण्यास नकार दिला. अविश्वसनीय नि:स्वार्थीपणा आणि दृढनिश्चय दाखवून फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. वचनबद्धतेसह, तू आम्हा सर्वांना प्रेरणा देत क्रीजवर टिकून राहिला. मला तुझ्या सांघिक भावनेचा आणि माझा जोडीदार असल्याचा नेहमीच अभिमान वाटतो. तुझ्यावर अविरत प्रेम!" अजिंक्य रहाणेने डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारतासाठी पहिले अर्धशतक झळकावले – अजिंक्य रहाणेने पहिल्या डावात ९२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारतासाठी अर्धशतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला. त्याने पॅट कमिन्सच्या चेंडूवर षटकार ठोकून आपले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. रहाणेने ५१२ दिवसांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून त्याचे पुनरागमन संघासाठी फायदेशीर ठरले. वृत्त लिहेपर्यंत तो अर्धशतकी खेळी खेळून क्रीजवर उपस्थित होता. रहाणेचे कसोटी क्रिकेटमधील हे २६ वे अर्धशतक होते. हेही वाचा - IND vs AUS WTC Final: “मी इतकी चांगली…”; अजिंक्य रहाणेच्या खेळीबद्दल एबी डिव्हिलियर्सच मोठं वक्तव्य डब्ल्यूटीसी फायनलचा तिसरा दिवस - तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चार विकेट गमावून १२३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया सध्या भारतावर २९६ धावांनी आघाडीवर आहे. पहिल्या डावात शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथची विकेट रवींद्र जडेजाने घेतली आहे. स्टीव्ह स्मिथ (३४ ) आणि ट्रॅव्हिस हेड (१८ ) धावावंर बाद झाले. चौथ्या दिवशीही भारतीय गोलंदाजांना शानदार गोलंदाजी करावी लागणार आहे.