U19 World Cup 2026 IND vs BAN Handshake: अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि बांगलादेश अंडर-१९ संघांमध्ये सामना खेळवला जात आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं आणि भारताने प्रथम फलंदाजी करताना २३८ धावा केल्या आहेत. पण या सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान नो हँडशेकचं दृश्य दिसलं. यावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश अंडर-१९ वर्ल्डकप सामन्यादरम्यान घडलेल्या हँडशेक घटनेबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्टीकरण दिलं आहे. दोन्ही देशांमधील तणावपूर्ण पार्श्वभूमी असताना, नाणेफेकीवेळी दोन्ही संघांचे कर्णधार एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसले नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना आशिया चषक २०२५ मधील भारत-पाकिस्तानमधील वादाची आठवण झाली.
१७ जानेवारीला शनिवारी, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने तातडीने प्रसिद्धीपत्रक काढत हा प्रकार अनवधानाने घडल्याचं स्पष्ट केलं. बोर्डाच्या म्हणण्यानुसार, उपकर्णधार जव्वाद अबरार यांनी आयुष म्हात्रेसोबत हस्तांदोलन न करणं हे कोणत्याही प्रकारचा अनादर दर्शवण्यासाठी नव्हतं. नियमित कर्णधार अझिझुल हकीम सामना सुरू होण्याआधी आजारी पडल्यामुळे जव्वाद अबरार त्याची जबाबदारी पार पडण्यासाठी गेला होता आणि त्या गडबडीत त्याच्या लक्षातून हे निसटलं, असंही बीसीबीने स्पष्ट केलं.
हँडशेक वादावर बांगलादेश क्रिकेट बोर्डाचं स्पष्टीकरण
भारत-बांगलादेश सामन्यापूर्वी नाणेफेकीदरम्यान घडलेल्या एका अनवधानाने झालेल्या घटनेची बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) दखल घेतली आहे. झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील टॉसवेळी झालेल्या प्रकारावर बीसीबीने स्पष्टीकरण दिलं आहे.
आजारी असल्याने नियमित कर्णधार अझिझुल हकीम टॉससाठी उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे उपकर्णधार जव्वाद अबरारने संघाचं प्रतिनिधित्व केलं. बीसीबीने स्पष्ट केलं की, विरोधी संघाच्या कर्णधाराशी हस्तांदोलन न होणं हे पूर्णपणे अनवधानाने घडलं असून, क्षणिक दुर्लक्षामुळे ही चूक झाली. यामागे कोणताही अपमान करण्याचा किंवा अवहेलना दाखवण्याचा हेतू नव्हता, असंही बोर्डाने नमूद केलं.
आजारपणामुळे नियमित कर्णधार अझिझुल हकीम टॉससाठी उपस्थित राहू शकला नाही. त्यामुळे उपकर्णधार जवाड अबरारने संघाचं प्रतिनिधित्व केलं. बीसीबीने स्पष्ट केलं की, विरोधी संघाच्या कर्णधाराशी हस्तांदोलन न होणं हे पूर्णपणे अनवधानाने घडलं असून, क्षणिक दुर्लक्षामुळे ही चूक झाली. यामागे कोणताही अपमान करण्याचा किंवा अवहेलना दाखवण्याचा हेतू नव्हता, असंही बोर्डाने ठामपणे नमूद केलं.
क्रिकेटमधील खिलाडूवृत्ती आणि प्रतिस्पर्ध्यांप्रती आदर राखणं हे बांगलादेशचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी मूलभूत घटक असल्याचं सांगत, बीसीबीने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिलं आहे. त्यानुसार संघ व्यवस्थापनाला तात्काळ योग्य सूचना देण्यात आल्या असून, खेळाडूंनाही खेळभावना, मैत्रीपूर्ण वर्तन आणि एकमेकांना सन्मान आपली जबाबदारी ओळखावी, याची पुन्हा एकदा आठवण करून देण्यात आली आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेरही क्रिकेटच्या मूल्यांप्रती आपली कटिबद्धता कायम असल्याचं बांगलादेश क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं आहे.
