भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. जिथे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना गमावला आहे आणि दुसरा सामना सुरू आहे. ही मालिका ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी आणि टी-२० मधून निवृत्ती घेतल्यानंतर त्या दोघांना क्रिकेट मैदानावर पाहण्यासाठी चाहते ऑगस्टमधील वनडे मालिकेची वाट पाहत होते. पण आता ही मालिका रद्द झाली आहे.
भारत वि. बांगलादेश यांच्यात पुढील महिन्यात ऑगस्टमध्ये वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार होती. भारतीय संघ ऑगस्टमध्येच बांगलादेश दौरा करणार होता, परंतु आता हा दौरा स्थगित करण्यात आला आहे. याची अधिकृत घोषणा बीसीसीआयने केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून बांगलादेशविरूद्धची ही मालिका रद्द होणार असल्याची चर्चा होती. पण आज ५ जुलै रोजी बीसीसीआयने यावर शिक्कामोर्तब केला.
भारतीय संघाच्या बांगलादेश दौऱ्यामध्ये तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार होते. मालिकेचा पहिला सामना १७ ऑगस्टपासून होणार होता. पण आता ही मालिका होणार नाहीये.
भारतीय संघाचा ऑगस्टमधील बांगलादेश दौरा रद्द
बीसीसीआयने शनिवारी प्रसिद्धीपत्रकात लिहिलं आहे की, दोन्ही क्रिकेट बोर्डांनी परस्पर संमतीने हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, टीम इंडिया ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करणार होती, परंतु ऑगस्ट २०२५ मध्ये होणारी ही मालिका सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही क्रिकेट संघांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मालिकेचे नवीन वेळापत्रक योग्य वेळी जाहीर केले जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून ही मालिका पुढे ढकलली जाण्याची भीती होती आणि यामागील खरे कारण दोन्ही देशांमधील तणाव असल्याचे सांगितले जात होते. गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये घडलेल्या प्रकरणानंतर बांगलादेश आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये दरी वाढत चालली आहे. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याकांच्या हत्या तसेच त्यांच्या नेत्यांच्या भारतविरोधी विधानांमुळे सतत संघर्षाची परिस्थिती होती. पण दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी दोन्ही संघांच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं आहे.