India won the Test series against Bangladesh 2-0 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारी कानपूरमध्ये पार पडली. रोहित शर्माच्या संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ७ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने दोन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली. कारण या मालिकेतील चेन्नई येथे झालेला पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकला होता. या मालिका विजयासह भारताने घरच्या मैदानावर सलग १८ कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या मालिकेतील भारताच्या विजयाची पाच प्रमुख कोणती होती, ते जाणून घेऊया.
रविचंद्रन अश्विनचे अष्टपैलू कामगिरी –
या मालिकेत भारताला विजय मिळवून देण्यात रविचंद्रन अश्विनने सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली. त्याने संपूर्ण मालिकेत अष्टपैलू कामगिरी करुन चाहत्यांची मनं जिंकली. ज्यामध्ये पहिल्या सामन्यात त्याच्या शानदार शतकाचा समावेश होता. त्याने दुसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा बॉलने आपली जादू दाखवण्यात यश मिळवले. त्यानी दोन्ही सामन्यात मिळून एकूण ११ विकेट्स घेतल्या. मालिकेतील या उत्कृष्ट कामगिरीसाठी अश्विनला ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार देण्यात आला. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकणारा मुथय्या मुरलीधरनसह संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
यशस्वी जैस्वालची तीन अर्धशतकं –
या मालिकेतील भारताच्या विजयात युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात सर्व भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांपुढे गुडघे टेकले होते, तेव्हा या युवा खेळाडूने एकट्याने गड लढवत अर्धशतक झळकावले होते. विशेष म्हणजे यशस्वी जैस्वालने या कसोटी मालिकेतील चारपैकी तीन डावात अर्धशतकं झळकावली. तो भारतासाठी या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने चार डावात भारतीय कर्णधार रोहित शर्मासह चांगली सुरुवात करुन देताना १८९ धावा केल्या.
हेही वाचा – IND vs BAN : कानपूर कसोटीत अश्विनची ऐतिहासिक कामगिरी, मुरलीधरनच्या ‘या’ खास विक्रमाची केली बरोबरी
या मालिकेत रोहित शर्माने मोठी खेळी खेळली नसली तरी, त्याने आपल्या संघाला प्रत्येकवेळी दमदार सुरुवात करुन देण्यात महत्त्वाचे योगदान दिले. रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ पावसाने वाया गेल्यानंतर मास्टरस्ट्रोक रणनीतीने सर्वांची मन जिंकले. रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीत वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन संघाला बॅझबॉल शैलीत फलंदाजी करण्यास सागितले. ज्यामुळे भारताने पाच दिवसाचा सामना अवघ्या दीड दिवसात जिंकला. रोहित शर्माने आपल्या रणनीतीसह आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने संघााच्या विजयात योगदान दिले.
भारतीय संघाचे दमदार क्षेत्ररक्षण –
कोणत्याही संघाच्या विजयात त्या संघाचे क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचे असते, हे भारतीय संघाने या मालिकेत दाखवून दिले. या दोन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने प्रत्येक विभागात शानदार कामगिरी केली, पण सर्वात जास्त योगदान हे क्षेत्ररक्षणाचे होते. कारण या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासह, यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुलसारख्या खेळाडूंनी प्रत्येकवेळी उत्कृष्ट झेल घेत सामन्याला कलाटणी देण्याचे काम केले. यापैकी रोहित शर्माने उडी मारत एका हाताने घेतलेलल्या झेलचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
हेही वाचा – VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य
भारतीय गोलंदाजांची दमदार गोलंदाजी –
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांचे योगदान पण तिथकेच महत्त्वाचे होते. कारण या मालिकेतील भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशच्या संघाला चारही डावात ऑलआऊट केले. फक्त ऑलआऊटच केले नाही, तर प्रत्येकवेळी कमी धावसंख्येवर रोखण्याचा प्रयत्न केला. या मालिकेत अश्विनने सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने ८ विकेट्स घेतल्या.