IND U-19 vs BAN U-19 Live Updates in Marathi: अंडर-१९ विश्वचषकाची सुरूवात भारतीय संघाने अमेरिकेविरूद्ध विजयाने केली. आज १७ जानेवारीला टीम इंडियाचा दुसरा सामना बांगलादेश संघाविरूद्ध होणार आहे. सध्या भारत आणि बांगलादेशमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेश संघाने टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतात सामने खेळण्यास नकार दिला आहे, अद्याप या विषयावर निर्णय झाला नसून बांगलादेश क्रिकेट बोर्ड व आयसीसी यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यामुळे अंडर-१९ विश्वचषकातील या सामन्यावर विशेष लक्ष असणार आहे. दरम्यान भारत-बांगलादेशच्या कर्णधारांनी नाणेफेकीदरम्यान हस्तांदोलन केलं नाही.

भारतीय संघ विजयी

पावसामुळे सुधारित लक्ष्य मिळालेल्या बांगलादेशचा डाव झटपट गुंडाळत भारतीय संघाने थरारक विजय मिळवला.

विहान मल्होत्राची भेदक गोलंदाजी

विहान मल्होत्राने ४ षटकात अवघ्या १४ धावांच्या मोबदल्यात ४ विकेट्स पटकावल्या आहेत. पावसामुळे खेळ सुरू झाल्यानंतर विहानच्या भेदक माऱ्यासमोर खेळताना बांगलादेशच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट उडाली.

भारत विजयाच्या दिशेने

लक्ष्य झटपट गाठण्याच्या प्रयत्नात बांगलादेशने पटापट विकेट्स गमावल्या आहेत. भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

बांगलादेशने गमावली सहावी विकेट

विहान मल्होत्राच्या चेंडूवर बसीर मोठा फटका खेळायला गेला आणि सीमारेषेजवळ असलेल्या वैभव सूर्यवंशीने चेंडू चांगला टाईम करत टिपला पण तो सीमारेषा पार करणार हे त्याला कळताच त्याने चेंडू थ्रो केला आणि बाहेर येत पुन्हा झेल टिपला. यासह संघाला सहावी विकेट मिळाली.

बांगलादेशचा सेट फलंदाज माघारी

खिलान पटेलने २५व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अझिझुल हकिम तमिम हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. तमिम ७२ चेंडूत ४ चौकार व एका षटाकारासह ५१ धावा करत बाद झाला.

विहान मल्होत्राने मिळवून दिल्या २ विकेट्स

आयुष म्हात्रेने उपकर्णधार विहान मल्होत्राला २२वं षटक टाकण्याची जबाबदारी दिली आणि त्याने दुसऱ्याच चेंडूवर सिद्दीकीला झेलबाद करत पहिली विकेट मिळवली. त्यानंतर स्पेलमधील पुढील २४व्या षटकात त्याने पाचव्या चेंडूवर शेख पवेज जिबॉनला झेलबाद करत संघाला चौथी विकेट मिळवून दिली. यासह बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे.

२९ षटकांचा होणार सामना

पावसामुळे दीड तासाचा मोठा ब्रेक झाल्यानंतर भारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना २९ षटकांचा होणार आहे. यासह बांगलादेशला डीएलएस पद्धतीनुसार १६५ धावांचं आव्हान मिळालं आहे. १७.२ षटकांत २ बाद ९३ धावा केलेल्या असल्याने बांगलादेशला ७० चेंडूत ७५ धावांची गरज आहे.४ गोलंदाज ६ षटकं टाकू शकतात तर १ गोलंदाज ५ षटकं टाकू शकतो.

सामन्यात पुन्हा ब्रेक

१८व्या षटकाला सुरूवात होताच पावसाची चिन्ह दिसू लागली. दोन चेंडू झाल्यावर पावसाचा जोर वाढल्यानंतर सामना पुन्हा थांबवण्यात आला. तोपर्यंत बांगलादेशने १७.२ षटकांत २ बाद ९० धावा केल्या आहेत. यासह बांगलादेशला विजयासाठी १४९ धावांची गरज आहे.

दुसरी विकेट

कनिष्क चौहानने १२व्या षटकात रिफत बेगला झेलबाद करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. यासह १२ षटकांत बांगलादेशने २ बाद ६३ धावा केल्या आहेत.

भारताला मिळाली पहिली विकेट

दिपेश देवेंद्रनने पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर जवाद अबरारला झेलबाद करवत संघाला पहिला ब्रेकथ्रू मिळवून दिला. पण पहिली विकेट गमावल्यानंतरही बांगलादेशच्या धावांचा वेग मात्र कायम आहे. ८ षटकांत संघाने १ विकेट गमावत ४४ धावा केल्या.

टीम इंडिया ऑल आऊट

अंडर-१९ विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाला बांगलादेशने ऑलआऊट केलं आहे. भारतीय संघ अखेरच्या षटकात चौथ्या चेंडूवर २३८ धावांवर सर्वबाद झाला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात दीपेश देवेंद्रन झेलबाद झाला. यासह बांगलादेश संघाचा वेगवान गोलंदाज अल फवादने पाच विकेट्स घेत उत्कृष्ट कामगिरी केली. यासह बांगलादेशला विजयासाठी भारताने २३९ धावांचं आव्हान दिलं आहे.

अभिज्ञान कुंडू झेलबाद

अभिज्ञान कुंडूने सामन्यात उत्कृष्ट खेळी करत संघाला २०० धावांच्या पलीकडे नेण्यात मोठी भूमिका बजावली. अभिज्ञान कुंडू ११२ चेंडूत ४ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ८० धावांची खेळी केली. यासह टीम इंडियाने ४७ षटकांत ९ बाद २२४ धावा केल्या आहेत.

सामन्याला पुन्हा सुरूवात

भारत आणि बांगलादेश सामन्याला पुन्हा सुरूवात झाली आहे. पावसामुळे सामना बराच वेळ थांबवण्यात आला होता. त्यामुळे आता ४९ षटकांचा सामना होणार आहे. सामना सुरू होताच भारताने एक विकेटदेखील गमावली आहे. अंबरीश झेलबाद झाला आहे.

भारत-बांगलादेश सामना थांबवला

भारताच्या धावांमध्ये अभिज्ञानच्या अर्धशतकानंतर भर पडताना दिसत होती. भारताने धावांची गती वाढवल्यानंतर ३९व्या षटकानंतर हा सामना अचानक थांबवण्यात आला. बुलावायोमध्ये सामना सुरू होण्यापूर्वीच ढगाळ वातावरण होतं आणि आता भारताच्या डावादरम्यान पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला आहे. भारताने ३९ षटकांत ६ बाद १९२ धावा केल्या आहेत. अभिज्ञान ६३ तर अंबरीश ४ धावांवर खेळत आहेत.

अभिज्ञान कुंडूचं अर्धशतक

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज अभिज्ञान कुंडूने भारताचा डाव सावरला असून शानदार अर्धशतक झळकावलं आहे. अभिज्ञानने ८१ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह अर्धशतक केलं आहे. यासह टीम इंडियाने ६ विकेट्स गमावत १८४ धावा केल्या आहेत.

भारताने गमावली पाचवी विकेट

भारतीय संघाने हरिवंश पंगालियाच्या रूपात पाचवी विकेट गमावली आहे. इमॉन हुसैनने पंगालियाला बाद करत भारताला अजून एक धक्का दिला. यासह भारताने ५ बाद ११९ धावा केल्या आहेत.

वैभव सूर्यवंशी झेलबाद

२७व्या षटकात इमॉन हुसेनने वैभव सूर्यवंशीला झेलबाद केलं आहे. गेल्या काही षटकांमध्ये एकही चौकार-षटकार लागला नव्हता, त्यामुळे धावांसाठी वैभव सूर्यवंशी मोठा फटका खेळायला गेला आणि विकेट गमावली. वैभव ६७ चेंडूत ६ चौकार व ३ षटकारांसह ७२ धावा करत बाद झाला. यासह भारताने २७ षटकांत ४ बाद ११७ धावा केल्या आहेत.

वैभव-अभिज्ञानची भागीदारी

वैभव सूर्यवंशी व अभिज्ञान कुंडू यांनी झटपट ३ विकेट्स पडल्यानंतर संघाचा डाव सावरला आहे.

वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक

पहिल्या सामन्यात फेल झाल्यानंतर अंडर-१९ वर्ल्डकपमधील दुसऱ्या वैभव सूर्यवंशीने एकट्याने संघाचा डाव सावरला आहे. बांगलादेशविरूद्ध सामन्यात एका टोकाकडून विकेट्स पडत असताना त्याने एका टोकाला राहून संघाचा डाव सावरला आहे. वैभवने ३० चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांसह अर्धशतक केलं आहे.

विहान मल्होत्रा झेलबाद

१०व्या षटकात अझिझुल हकिमने विहान मल्होत्राचा कमालीचा डिफेन्स मोडत त्याला झेलबाद करत माघारी धाडलं. विहानच्या बॅटची कड घेत चेंडू स्लिपमध्ये गेला आणि संघाला तिसरी विकेट गमावावी लागली. भारताने यासह १० षटकांत ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशी व गेल्या सामन्यातील हिरो अभिज्ञान कुंडू फलंदाजी करत आहेत.

दोन चेंडूत २ विकेट्स

तिसऱ्या षटकात अल फहाद या वेगवान गोलंदाजाने आधी कर्णधार आयुष म्हात्रेला झेलबाद केलं. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला वेदांत त्रिवेदी पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये झेलबाद झाला. यासह भारत २ बाद १३ धावांवर खेळत आहे.

सामन्याला सुरूवात

भारत आणि बांगलादेश अंडर-१९ विश्वचषक सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताचे सलामीवीर वैभव सूर्यवंशी व आयुष म्हात्रेची जोडी मैदानावर उतरली आहे.

भारताची प्लेईंग इलेव्हन

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), कनिष्क चौहान, हरवंश पंगालिया, आरएस अंबरिश, हेनिल पटेल, दीपेश देवेंद्रन, खिलान पटेल

बांगलादेशची प्लेईंग इलेव्हन

मोहम्मद रिफत बेग, जवाद अबरार, मोहम्मद अझीझुल हकीम तमीम (कर्णधार), कलाम सिद्दीकी अलीन, मो. रिझान होसन, मोहम्मद फरीद हसन फैसल(विकेटकीपर), मोहम्मद समियून बसीर रातुल, शेख पावेझ जिबोन, अल फहाद, साद इस्लाम रझिन, इक्बाल हुसैन इमोन

नाणेफेक

भारत आणि बांगलादेश अंडर-१९ विश्वचषक २०२६ सामन्याची नाणेफेक बांगलादेश संघाने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. बुलावायोमध्ये ढगाळ वातावरण असून पाऊस पडण्याची चिन्ह आहेत, त्यामुळे फलंदाजी सांभाळून करावी लागणार आहे.